कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; श्रीलंकने भारताचा ४८ वर्षापूर्वीचा विक्रम मागे टाकला

चट्टग्राम: भारतीय खेळाडू आयपीएलचा १७वा हंगाम खेळत आहेत. आयपीएलची धामधुम सुरू असताना कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. सध्या श्रीलंकेचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे आणि दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेने ३२८ धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने कसोटी क्रिकेटमधील ४८ वर्षापूर्वीचा विक्रम मागे टाकला.

मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात ५३१ धावा केल्या. यासह श्रीलंकेने ४८ वर्षापूर्वी भारतीय संघाने केलेला विक्रम मागे टाकला. भारताने १९७६ साली कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध ९ बाद ५२४ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताकडून सुनील गावस्कर ६६, मोहिंदर अमदरनाथ ७०, गुंडप्पा विश्वनाथ ६८, अशोक मांकड ५०, सैयद किरमानी ६४, बिशन सिंह बेदी ५० अशा सहा फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाही फलंदाजाने शतक न करता एका डावात करण्यात आलेली ही सर्वात मोठी धावसंख्या होती. श्रीलंकेच्या संघाने टीम इंडियाचा हा विक्रम ४८ वर्षानंतर मागे टाकला.

श्रीलंकेने पहिल्या डावात ५३१ धावा केल्या. ज्यात ६ फलंदाजांच्या अर्धशतकाचा समावेश होता. पहिल्या कसोटीत शतक करणारा कामिंडु मेंडिसने नाबाद ९२ धावा केल्या, कारण लंकेची १०वी विकेट पडली. या शिवाय कुशल मेंडिसने ९३, दिमुथ करुणारत्नेने ८६, कर्णधार धनंजय डिसिल्वाने ७०, दिनेश चांदीमलने ५९ आणि निशान मदुसंकाने ५७ धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून शाकिब-अल-हसनने ११० धावा देत ३ विकेट घेतल्या. हसन महमूदने २ विकेट घेतल्या. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत बांगलादेशचा डाव १७८ धावांवर ऑलआउट झाला होता. बांगलादेश ३५३ धावांनी पिछाडीवर आहे आणि श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेच्या बांगलादेश दौऱ्यातील टी-२० मालिका लंकेने २-१ अशी जिंकली, तर वनडे मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली होती. आता कसोटी मालिकेत श्रीलंका विजय होईल असे चित्र दिसत आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-01T09:43:15Z dg43tfdfdgfd