क्रिकेटमधली चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरु होणार का, जय शाह घेणार मोठा निर्णय

मुंबई : क्रिकेटमधली चॅम्पियन्सस लीग ही स्पर्धा पुन्हा सुरु करण्याचा विचार सुरु झाला आहे. पण चॅम्पियन्स लीग सुरु करायची की नाही, याचा निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हातात असल्याचे आता समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे इंग्लंड अँड वेल्स आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाच्या सहकार्याने चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्याबाबत विचार करीत आहे. पुरुषांच्या चॅम्पियन्स लीगसाठी तूर्तास कालावधी उपलब्ध नाही. त्यामुळे चॅम्पियन्स लीगचे पुनरुज्जीवन महिलांच्या लीगने करण्याचा विचार होत आहे.

चॅम्पियन्स लीगचे पुनरुज्जीवन होणार का या थेट प्रश्नावर चर्चा तर सातत्याने होत आहे; पण बीसीसीआयचे सचिव जय शाहच नेमके सांगू शकतील, असे 'क्रिकेट व्हिक्टोरिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी निक कमिन्स यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' नक्कीच तयार होईल, सध्या कधी घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक मात्र चॅम्पियन्स लीगने क्रिकेटमध्ये मोठी क्रांती होईल, असेही त्यांनी सांगितले.

मेलबर्न क्रिकेट अकादमीने क्रिकेट व्हिक्टोरियाच्या सहकार्याने खेलोमोअर उपक्रम सुरू केला आहे. त्या वेळी भारताचे माजी फलंदाज; तसेच सध्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असलेले जतिन परांजपे आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डेव्हिड हसी उपस्थित होते.

कमिन्स यांनी पुढे सांगितले की, 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांच्यासह मी सातत्याने चॅम्पियन्स लीगबाबत चर्चा करीत आहे. या लीगचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम लीग कोणती याची चर्चाच होत आहे. आयपीएल, पीएसएल, बिग बॅश बाबत प्रत्येकाचे मत भिन्न आहे. मेलबर्न स्टार्सची कराची किंग्ज किंवा मुंबई इंडियन्सविरुद्ध लढत झाली, तरच याचे उत्तर मिळेल.'

चॅम्पियन्स लीग यापूर्वीही झाली आहे; पण ती लीगची संकल्पना पूर्ण स्थिरावण्यापू्र्वीच सुरू झाली होती. त्या वेळी सर्व लीग परिपक्व झाल्या नव्हत्या. आता परिस्थिती बदलली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड; तसेच बीसीसीआय यांच्यात चॅम्पियन्स लीगचे पुनरुज्जीवन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या लीगसाठी कालावधी उपलब्ध नाही, हा मुख्य प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धा वाढल्यामुळे हा प्रश्न जास्तच किचकट झाला आहे. त्यामुळे सुरुवातीस महिलांसाठी चॅम्पियन्स लीग होऊ शकते. या लीगमध्ये डब्ल्यूपीएल, दी हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगमधील संघ असतील, असे कमिन्स यांनी सांगितले.

फुटबॉलमध्ये यशस्वीवर्ल्ड कप फुटबॉल असतानाही युरो चॅम्पियन्स लीगचे महत्त्व कमी झालेले नाही, याकडे कमिन्स यांनी लक्ष वेधले. बिग बॅश लीगमध्ये आघाडीचे भारतीय क्रिकेटपटू खेळण्याचे स्वप्न आम्ही बघत आहोत. चॅम्पियन्स लीग खरे तर तातडीने सुरू करण्याची गरज आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामना मेलबर्नवर होणे याचे जेवढे औत्सुक्य आहे, तेवढेच औत्सुक्य मुंबई इंडियन्स-मेलबर्न स्टार्स लढतीचे असेल, असे कमिन्स म्हणाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T10:43:01Z dg43tfdfdgfd