गुजरात टायटन्सचा खरा गेम तर अजिंक्यने केला; सलग दुसऱ्या मॅचमध्ये केली गेम चेंजर कामगिरी, व्हिडिओ पाहा सर्व काही समजेल

चेन्नई: आयपीएल २०२४ मध्ये मंगळवारी झालेल्या सातव्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सवर कडकडीत विजय मिळवला. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचा डोंगर उभा केला होता. उत्तरादाखल गुजरातला ८ बाद १४३ धावा करता आल्या. चेन्नईने ही लढत ६३ धावांनी जिंकली. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली इतक नाही तर त्यांचे नेट रनरेट हे जवळ जवळ प्लस दोन (+ १.९७९) झाले आहे.

घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत चेन्नईकडून अनेकांनी दमदार कामगिरी केली. सलामीवीर रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांच्या मोठ्या खेळीसह समीर रिझवीने पदार्पणातील लढतीत चमक दाखवली. त्यानंतर गोलंदाजीत रविंद्र जडेजा वगळता सर्वांनी विकेट घेतल्या. या सर्व कामगिरीत एका खेळाडूच्या कामगिरीकडे फार कोणाचे लक्ष गेले नाही. हा खेळाडू म्हणजे भारताचा स्टार कसोटीपटू अजिंक्य रहाणे होय.

फलंदाजीत अजिंक्यला फार चांगली कामगिरी करता आली नाही. तो १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. पण जेव्हा चेन्नईची गोलंदाजी सुरू असताना अजिंक्यने अफलातून फिल्डिंग केली. ज्यामुळे चेन्नईच नाही तर गुजरात टायटन्सच्या खेळाडू, चाहत्यांना धक्का बसला.

चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून गुजरातला एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली होती. गुजरातने ५५ धावसंख्येवर ३ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर डेव्हिड मिलर गुजरातला संकटातून बाहेर काढणार असे दिसत होते. त्याने १५ चेंडूत ३ चौकारांसह २१ धावा केल्या होत्या. मिलर धोकादायक ठरेल असे वाटत असताना अजिंक्य रहाणेने अशी काही कमाल केली ज्याने गुजरातच्या हातातून सामना निसटला आणि चेन्नईचे मॅचवर पकड मिळवली.

चेन्नईकडून १२वे षटक तुषार देशपांडेने टाकले. या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मिलरने डीप एक्सट्रा कव्हरच्या दिशेने हवेत शॉट खेळला. पण मिलरला बॉल टाइम करता आला नाही. त्याने शॉट मारल्या मारल्या चेन्नईच्या खेळाडूने कॅच असा कॉल दिला. सीमा रेषेवर उभा असलेल्या अजिंक्य रहाणे धावत पुढे आला आणि उडी मारत एक अफलातून कॅच घेतला. अजिंक्यचा कॅच पाहून सर्वजण हैराण झाले. हा कॅच पाहून मॅच पाहण्यासाठी आलेली मिलरची पत्नी कॅमिला हॅरिसनच्या चेहऱ्यावरील रंग उडाले.

अजिंक्यने पहिल्या सामन्यात देखील अशाच प्रकारे फिल्डिंग केली होती. तेव्हा त्याने विराट कोहलीला बाद करण्यात योगदान दिले होते. विराटने मारलेला चेंडू अजिंक्यने कॅच केला पण तो सीमे रेषेला स्पर्श करेल असे वाटताच त्याने चेंडू जवळ उभ्या असलेल्या रचिन रविंद्रकडे फेकला आणि विराट बाद झाला. विराट कोहलीच्या विकेट पुढे कॅच म्हणून रचिनचे नाव आले असले तरी त्याचे श्रेय अजिंक्यचे होते.

2024-03-27T10:01:31Z dg43tfdfdgfd