जिंकणाऱ्या मॅचमध्ये पराभव करून घेतला; २२३ धावा करणाऱ्या KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी कारवाई

नवी दिल्ली: आयपीएल २०२४ मध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करत २२३ धावांचा डोंगर उभा केला होता. तरी देखील राजस्थानने २ विकेट राखून त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर केकेआरच्या कर्णधारावर मोठी कारवाई झाली आहे.

विजयासाठी २२४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानला जोस बटलरच्या शतकी खेळीने विजय मिळवून दिला. बटलरने ६० चेंडूत नाबाद १०७ धावांची खेळी केली. या लढतीत विजय मिळून राजस्थानने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

कोलकाता संघासाठी हा पराभव मोठा धक्काच ठरला. २००हून अधिक धावा करून देखील गोलंदाजांना त्याचे संरक्षण करता आले नाही. पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरवर षटकांची गती कमी झाल्याबद्दल कारवाई करण्यात आली. या हंगामात अय्यरकडून झालेली ही मोठी चूक असल्याने त्याला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

राजस्थानविरुद्धच्या लढतीत विजय मिळून केकेआरला गुणतक्त्यात अव्वल स्थानी जाण्याची संधी होती. पण आता ते दुसऱ्या स्थानावर कायम राहिले आहेत. सहा मॅचमध्ये त्यांनी चार विजय मिळवले आहेत. तर राजस्थानने ७ पैकी ६ विजयासह १२ गुण मिळवत अव्वल स्थान कायम राखले आहे.

या लढतीत केकेआरकडून सलामीवीर सुनील नरेनने ५६ चेंडूत १०९ धावांची शतकी खेळी केली. त्याने १३ चौकार आणि ६ षटकारांसह १९४च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. टी-२० करिअरमधील हे त्याचे पहिले शतक ठरले. २२४ धावांचा लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. पण बटलर अखेरपर्यंत मैदानावर थांबल्याने त्यांना विजय साकारता आला. राजस्थानकडून यशस्वीने ९ चेंडूत १९, रियान परागने १४ चेंडूत ३४ आणि पॉवेलने १३ चंडूत २६ धावांचे योगदान दिले. साखळी फेरीत राजस्थानच्या अजून ७ लढती असून त्यापैकी ३ लढतीत विजय मिळवल्यास त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होऊ शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T10:54:11Z dg43tfdfdgfd