टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विक्रम विराटच्या नावावर, ठरला पहिला भारतीय; एकाच सामन्यात केले दोन मोठे रेकॉर्ड्स

बेंगळुरू: आयपीएल २०२४ मधील सहावी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १७६ धावा केल्या आहेत. आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीने ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या लढतीत विराटने दोन विक्रम केले आहेत.

फलंदाजीला येण्याआधी विराटने आरसीबीची गोलंदाजी सुरू असताना कमाल केली. या लढतीत त्याने दोन कॅच घेतले. पहिला सलामीवीर जॉनी बेयरस्टोचा तर दुसरा कर्णधार शिखर धवन याचा होय. या दोन्ही कॅचमुळे विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेलाय. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी पोहोचला आहे.

रन मशीन अशी जरी विराटची ओळख असली तरी तो एक उत्तम फिल्डर देखील आहे. जगातील सर्वोत्तम फिल्डर्समध्ये त्याचा समावेश होतो. पंजाबा किंग्जविरुद्ध दोन कॅच पकडून त्याचे टी-२० क्रिकेटमध्ये १७४ कॅच झाले. यातील ५२ कॅच त्याने भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर आयपीएलमध्ये १०८ कॅच घेतले आहेत.

आजच्या लढतीत विराटने सुरेश रैनाचा विक्रम मागे टाकला. भारताचा माजी क्रिकेटपटू रैनाने १७२ कॅच पकडले होते. रैनाचा समावेश सर्वोत्तम फिल्डर्समध्ये होत असे. या यादीत तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. हिटमॅनने टी-२०मध्ये भारताकडून सर्वाधिक ६० कॅच पकडले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ९९ कॅच आहेत. चौथ्या स्थानावर मनीष पांडे असून त्याने १४६ कॅच घेतले आहेत. पाचव्या स्थानावर सूर्यकुमार यादव असून त्याने ६४ कॅच घेतले आहेत. धक्कादायक म्हणजे या यादीत रविंद्र जडेजाचा समावेश पहिल्या ५ मध्ये नाही.

विराटचा दुसरा मोठा विक्रम

फिल्डिगमध्ये कमाल करणाऱ्या विराट कोहलीने फलंदाजी देखील चमकदार कामगिरी केली. विराटने पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावले. टी-२० क्रिकेटमधील हे त्याचे १००वे अर्धशतक ठरले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानी वेस्ट इंडिजचा माजी विस्फोटक फलंदाज क्रिस गेल असून त्याने ११० अर्धशतक केली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे. त्याच्या नावावर १०९ अर्धशतकं आहेत. विराटनंतर चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम असून त्याने ९८ अर्धशतकं केली आहेत.

2024-03-25T17:42:44Z dg43tfdfdgfd