टी-२० क्रिकेटमध्ये अशी बॅटिंग कोण करतं? विराटच्या धावांपेक्षा चेंडूची चर्चा जास्त, अर्धशतक केलं पण...

विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक झळकावून ऑरेंज कॅपवर आपली पकड भक्कम केली असेल, पण आयपीएलमध्ये त्याची संथ फलंदाजी समजण्यापलीकडे आहे. २५ एप्रिलला हैदराबादविरुद्ध विराटने ४३ चेंडूमध्ये ५१ धावा केल्या. टी-२० फॉरमॅटमध्ये संथ फलंदाजी केल्याबद्दल त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. पॉवरप्लेनंतर खेळलेल्या ओव्हर्समध्ये विराटने २५ चेंडूत केवळ १९ धावा केल्या. पहिल्या ३२ धावा करण्यासाठी त्याने १६ चेंडूंचा वापर केला, तर पुढच्या २७ चेंडूंमध्ये तो केवळ १९ धावा करू शकला. आता अशा कामगिरीच्या जोरावर विराटला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळावे का? असा सवाल निर्माण होत आहे.

या सामन्यात नाणेफेकनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सात गडी गमावून २०६ धावा केल्या. विराट कोहली आणि फॅफ डुप्लेसिस यांनी मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला झंझावाती सुरुवात करून दिली, पण चौथ्या षटकात १२ चेंडूत २५ धावा काढून फाफ डुप्लेसिस बाद होताच विराट कोहलीने वेग कमी केला. त्यानंतर नवीन फलंदाज रजत पाटीदारने जबाबदारी स्वीकारली. त्याने १९ चेंडूत झंझावाती अर्धशतक केले आणि २०व्या चेंडूवर बाद झाला. मात्र विराट कोहलीची संथ खेळी सुरूच राहिली. विराट १५व्या षटकात जयदेव उनाडकटचा बळी ठरला.

त्यानंतर कॅमेरून ग्रीनने २० चेंडूत नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. स्वप्नील सिंगने सहा चेंडूत १२ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये झटपट धावा करत आरसीबीला २०० धावांच्या पुढे नेले. सनरायझर्स हैदराबादकडून जयदेव उनाडकटने तीन तर टी नटराजनने दोन गडी बाद केले. मयंक मार्कंडेने एक विकेट घेतली.

विराट कोहलीने मात्र त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०व्यांदा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ऑरेंज कॅप क्रमवारीत आपली आघाडी वाढवली. जयपूरमध्ये राजस्थानविरुद्धच्या ७२ चेंडूत केलेल्या ११३ धावांसाठी कोहलीवरही अशीच टीका झाली होती. कोहलीची धावसंख्या असूनही, आरसीबीने केवळ १८२ धावा केल्या, ज्याचा पाठलाग रॉयल्सने केवळ १६.५ षटकांत केला होता. यामुळे तो ट्रोल झाला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-25T17:39:18Z dg43tfdfdgfd