टी-२० वर्ल्डकपसाठी ICCचा मोठा निर्णय; पाऊस पडला तरी लागणार निकाल, सेमीफायनल-फायनलसाठी या नियमाला दिली मंजूरी

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवसाला मंजूरी दिली आहे. लीग अथावा सुपर-८ फेरीतील मॅच पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या डावातील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या किमान ५ ओव्हर झाल्या पाहिजेत. तर नॉकआउट फेरीतील मॅच पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या डावातील किमान १० ओव्हर झाल्या पाहिजेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलची पहिली लढत २६ जून रोजी गुयाना आणि दुसरी २७ जून रोजी त्रिनिदाद येथे होईल. अंतिम मॅच २९ जून रोजी बारबाडोस येथे होणार आहे. ग्रुप फेरीतील लढती १ ते १८ जून या काळात तर सुपर ८ फेरीतील लढती १९ ते २४ जून या काळात होणार आहेत.

स्पर्धेची सुरुवात एक जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्या लढतीने होईल. गेल्या म्हणजे २०२२ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ सुपर ८ मध्ये जातील. त्यानंतर या संघांना प्रत्येकी ४ या प्रमाणे दोन गटात विभागले जाईल. सुपर ८ मधील प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतील.

ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका सारखे संघ आहेत. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलंड, ओमान. ग्रुप सी मध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी तर ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ या देशांचा समावेश आहे. ९ जून रोजी भारताची लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी राखीव दिवसांना मंजूरी देण्यासोबत आयसीसीने पुढील म्हणजे २०२६ साली भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या पात्रता प्रक्रियेला मंजूरी दिली आहे. या स्पर्धेत २० संघांचा सहभाग असेल. ज्यातील १२ संघ ओपोआप पात्र होतील. २०१४च्या वर्ल्डपकमधील ८ संघ आणि भारत व श्रीलंका हे संघ आपोआप पात्र होतील. अन्य दोन संघ हे ३० जून रोजी आयसीसी टी-२० क्रमवारीतील रँकिंगमधील संघ असतील. त्यानंतरच्या जागांसाठी पात्रता फेरीच्या लढती होतील.

2024-03-15T16:48:17Z dg43tfdfdgfd