टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार? BCCIने दिली मोठी अपडेट, खेळाडू या तारखेला रवाना होतील

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. भारतीय खेळाडू सध्या आयपीएलचा १७वा हंगाम खेळत आहेत आणि हा हंगाम सुरू असतानाच टी-२० वर्ल्डपकसाठीच्या संघाची घोषणा होणार आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील १५ जणांची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख १ मे निश्चित केली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २५ मे पर्यंत सुरुवातीला जाहीर केलेल्या संघातील खेळाडू बदलण्याची संधी असेल.

नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयमधील सूत्रांनी ही माहिती दिली. टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होईल. तोपर्यंत आयपीएलचा पहिला टप्पा पूर्ण झाला असेल. ज्यामुळे राष्ट्रीय निवड समितीला निवड करताना खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस लक्षात येईल.

वर्ल्डकपसाठी संघातील खेळाडू १९ मे रोजी न्यूयॉर्कसाठी रवाना होतील. तोपर्यंत आयपीएलमधील साखळी लढती संपल्या असतील. ज्या खेळाडूंचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असतील ते भारतात थांबतील. अन्य खेळाडू न्यूयॉर्कला जातील. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या वेळी अशाच पद्धतीने काही खेळाडूंना पुढे पाठवण्यात आले होते.

या वेळी टी-२० वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. त्यामुळे राखीव खेळाडू देखील संघासोबत जातील. जेणेकरून मुख्य संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा अन्य काही कारणामुळे खेळाडूला खेळता नाही आले तर लॉजिस्टिकल अडचण येऊ नये. निवड समितीतील चार ही सदस्य मॅच पाहण्यासाठी जाणार आहेत. खेळाडूंना वर्ल्डपकच्या दृष्टीने वर्कलोड मॅनेजमेंट संदर्भात कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. वर्ल्डकमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच म्हणजे ए गटात असून त्यासोबत कॅनडा, आयर्लंड, अमेरिका हे देश देखील आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-30T18:09:28Z dg43tfdfdgfd