डेव्हिड वॉर्नर ठरला दिल्लीच्या पराभवाचा व्हिलन, सामना नेमका कुठे फिरला टर्निंग पॉइंट पाहा...

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा सामना विजयाच्या दिशेने कूच करत होता. एका षटकात दोन विकेट्स दिल्लीला मिळाल्या होत्या. त्यामुळे दिल्ली आता हा सामना जिंकू शकते, असे वाटत होते. पण त्याचवेळी डेव्हिड वॉर्नर दिल्लीच्या पराभवाचा व्हिलन बनल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नरच्या एका चुकीमुळे हा सामना फिरला आणि त्यामुळे दिल्लीच्या हातून हा सामना निसटल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीचा संघ कसा विजयाच्या जवळ पोहोचला होता, जाणून घ्या...

सॅम करन हा दिल्लीच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडसर होता. कारण करनने यावेळी अर्धशतक पूर्ण केले होते आणि तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचवेळी १९ व्या षटकात सामन्याची कूस बदलल्याचे पाहायला मिळाले. हे षटक दिल्लीच्या संघाकडून खलील अहमद टाकत होता. या १९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर खलीलने करनला क्लीन बोल्ड केले आणि पंजाबच्या संघाला मोठा धक्का दिला. करन यावेळी ६३ धावा करून बाद झाला. खलीलने या षटकात अजून एक धक्का पंजाबच्या संघाला दिला. खलीलने या षटकाच्या त्यांनतरच्याच चौथ्या चेंडूवर पंजाबच्या शशांक सिंगला बाद केले आणि दिल्लीला अजून एक यश मिळवून दिले. त्यामुळे दिल्लीचा संघ विजयाच्या मार्गावर परतत होता. पण तिथेच वॉर्नरकडून एक मोठी चूक घडली.

वॉर्नरकडून यावेळी कोणती मोठी चूक घडली, पाहा...

खलीलने एकाच षटका पंजाबला दोन धक्के दिले. या १९ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर हरप्रीत ब्रार फलंदाजी करत होता. यावेळी हरप्रीत एक मोठा फटका मारण्यासाठी गेला खरा, पण खलीलने अचूक चेंडू टाकला होता. त्यामुळे हरप्रीतचे टायमिंग चुकले आणि चेंडू हवेत उडाला. यावेळी वॉर्नरला एक सोपा झेल पकडण्याची संधी आली होती. झेल पकडण्यासाठी वॉर्नर सरसावला, पण त्याला हा झेल पकडता आला नाही. वॉर्नरने एकतर यावेळी हरप्रीतला जीवदान दिले आणि त्याचबरोबर पंजाबच्या संघाने दोन धावा धावून काढल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी दुहेरी धक्का बसला. जर वॉर्नरने हा सोपा झेल पकडला असता तर दिल्लीच्या संघाला एक विकेट मिळाली असती आणि दोन धावाही वाचवता आल्या असत्या. पण वॉर्नरच्या एका चुकीमुळे दिल्लीच्या संघाला डबल धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.

वॉर्नरने आतापर्यंत दिल्लीसाठी चांगली कामगिरी केली होती. पण या एका चेंडूवर वॉर्नरच्या चुकीमुळे दिल्लीच्या संघाची लय बिघडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला विजयापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे वॉर्नरने सोडलेला झेल दिल्लीच्या संघाला चांगलाच महागात पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

2024-03-23T14:52:57Z dg43tfdfdgfd