'..तर ते लोक गल्ली क्रिकेटमधले', विराटसंर्भातील 'त्या' चर्चेने संतापला पाकिस्तानी क्रिकेटपटू

Virat Kohli Place In T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू दिला जाईल अशी शक्यता व्यक्त करणाऱ्या बातम्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विराट कोहली मागील अडीच महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. तसेच तो मोठ्या फॉरमॅटमधील क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याने त्याला टी-20 मधून बाहेर काढलं जाईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. मात्र विराटला टी-20 संघाबाहेर ठेवण्याच्या या चर्चेसंदर्भात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. विराटला टी-20 संघाबाहेर ठेवलं जाईल असं म्हणणाऱ्यांना इरफानने झापलं आहे. 

विराट 14 महिन्यांपासून टी-20 खेळलेला नाही

'टेलीग्राम'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय निवड समितीमधील निवडकर्ते विराट कोलहीला टी-20 संघामधून वगळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपसाठी विराटचा विचार होणार नसल्याच्या दाव्यामागील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील 14 महिन्यांपासून तो टी-20 सामना खेळलेला नाही. या 14 महिन्यांमध्ये तो केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या जानेवारीमध्ये एक मालिका खेळलेला. मात्र असं असलं तरी विराटला भारतीय संघातून डच्चू देण्याचा विचार अगदीच चुकीचा असल्याचं पाकिस्तानच्या मोहम्मद इरफानने म्हटलं आहे. विराटवर टीका करणाऱ्यांचा समाचार मोहम्मद इरफानने घेतला आहे.

त्याच्याशिवाय संघाचा विचार...

"त्याने मागील काही काळात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. संघातील त्याचं स्थान कायम राहणार की नाही याबद्दल शंका घेणं चुकीचं वाटतं," असं मोहम्मद इरफानने म्हटलं आहे. "जे लोक विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळणार नाही असं म्हणत आहेत ते गल्ली क्रिकेटमधील लोक आहेत. याबद्दल माझं कोणतही दुमत नाही. विराट कोहलीशिवाय तुम्ही संघाचा विचार करु शकत नाही कारण तो फार मोठा खेळाडू आहे," असं मोहम्मद इरफानने 'न्यूज 24' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने अनेक सामने एक हाती जिंकवले आहेत याची आठवण मोहम्मद इरफानने विराटच्या टीकाकारांना करुन दिली आहे. 

नक्की वाचा >> 'धोनी विलचेअरवर असेल तर CSK...'; माजी सहकाऱ्याचं MSD च्या निवृत्तीबद्दल सूचक विधान

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

"त्याने मागील वर्षी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये काय केलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. विराट कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये 3-4 सामने एकट्याने जिंकून दिली आहेत. विराट कोहलीने त्यावेळेस उत्तम कामगिरी केली नसती तर भारत 3 ते 4 सामने पराभूत झाला असता ज्यामध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील सामन्यांचाही समावेश होता. या सामन्यांमध्ये भारताने लवकर विकेट्स गमावल्यानंतर विराटनेच डावाला आकार दिला होता. त्याने एकट्याने हे सामने जिंकून दिलेले," असं मोहम्मद इरफान म्हणाला. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलिया 2022 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला होता. 

नक्की वाचा >> 'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य

विराटने कसोटी मालिकेमधून घेतली माघार

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमधून माघार घेतली होती. पत्नी अनुष्का गरोदर असल्याने विराटने खासगी कारण देत माघार घेतल्याचं विराट-अनुष्काने मुलाचा जन्म झाल्याचं जाहीर केल्यानंतर स्पष्ट झालं. विराट आता 22 मार्चपासून सुरु होत असलेल्या इंडियन प्रिमिअम लीगमध्ये पुन्हा मैदानावर पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप विराट चेन्नास्वामी मैदानावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाबरोबर सराव शिबिरात सहभागी झालेला नाही. आरसीबीचा पहिला सामना 22 तारखेला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. 

2024-03-15T09:30:46Z dg43tfdfdgfd