दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत, काही सामन्यांना मुकण्याची शक्यता

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर ७ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्याआधीच दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडूला बाहेर पडावं लागलं आहे. मिचेल मार्श असं या अष्टपैलू खेळाडूचे नाव आहे. मार्शने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ४२ सामने खेळून १२७ च्या स्ट्राईक रेटने ६६५ धावा आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार मिचेल मार्श असून आगामी टी-२० विश्वचषकातही तो ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मिचेल मार्शने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर त्याला या स्पर्धेत फारशी संधी मिळाली नव्हती. मिचेल आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यासारख्या विविध फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२२ मध्ये त्याने आठ सामन्यांमध्ये २५१ धावा केल्या होत्या. २०२३ मध्ये, त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी १२ विकेट घेतल्या होत्या.

दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मिचेल मार्शच्या दुखापतीबद्दल खुलासा केला आहे. गांगुलीने मात्र मार्शला झालेल्या दुखापतीचे स्वरूप सांगितले नाही. मार्श मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच तो येणारे पुढील काही सामन्यात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून दिल्लीच्या चाहत्यांची एकच इच्छा असेल की मिचेल मार्शने लवकरात लवकर तंदुरूस्त होऊन परत अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदानावर हजर व्हावे.

दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी

आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत दिल्लीच्या संघाने नवव्या स्थानावर आपला हंगाम संपवला. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी निराशाजनक होती. यावेळी पंतच्या पुनरागमनामुळे दिल्लीचे भवितव्य बदलेल असे वाटत असतानाच दिल्लीच्या चाहत्यांच्या हाती निराशाच पडत असल्याचे दिसून येत आहे. पंतच्या आगमनानेही फारसा फरक पडला नाही. दिल्लीने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. ज्यापैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर केवळ एकाच सामन्यात ते यशस्वी झाले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-06T17:30:38Z dg43tfdfdgfd