दिल्लीने गुजरातची त्यांच्याच घरात लाज काढली, फक्त ९ षटकांतच साकारला दणदणीत विजय

अहमादाबाद : अचूक गोलंदाजी आणि त्यानंतर धडाकेबाज फलंदाजी, या दोन्ही गोष्टींच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय साकारला. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात होता. त्यामुळे दिल्लीने गुजरातची त्यांच्या घरच्या मैदानातच लाज काढल्याचे पाहायला मिळाले. गुजरातचे फलंदाज यावेळी कुचकामी ठरले आणि त्यामुळेच त्यांचा डाव ८९ धावांत आटोपला. दिल्लीच्या संघाने हे आव्हान यशस्वीपणे पार करत विजय साकारला. दिल्लीने यावेळी गुजरातवर सहा विकेट्स आणि ६७ चेंडू राखून विजय साकारला.

गुजरातच्या ९० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या षटकात दिल्लीने १४ धावा काढल्या, पण दुसऱ्या षटकात त्यांना जेक प्रेझरच्या रुपात पहिला धक्का बसला. जेकने १० चेंडूंत २० धावा केल्या. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात पृथ्वी शॉदेखील बाद झाला, त्याला ७ धावाच करता आल्या. त्यानंतर दिल्लीला अभिषेक पोरेल आणि शाई होप यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर ऋषभ पंतने मैदानात येत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्लीने टॉस जिंकला आणि ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय किती योग्य आहे हे त्यांच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. इशान शर्माने दिल्लीच्या संघाला पहिला धक्का दिला. इशांतने यावेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला ८ धावांवर बाद केले. गिल बाद झाला आणि त्यानंतर गुजरातचा डाव घसरायला सुरुवात झाली गिलनंतर वृद्धिमान साहा २ धावांवर आऊट झाला. त्यानंतर साई सुदर्शन १२, डेव्हिड मिलर २ आणि शाहरुख खान बाद झाले. शाहरुखला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे गुजरातची यावेळी ६ बाद ४८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर गुजरातच्या संघासाठी धावून आला तो रशिद खान.

रशिद खानने काही काळ दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रशिदने यावेळी २४ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३१ धावांची खेळी साकारली. गुजरातकडून ही सर्वाधिक धावांची खेळी ठरली. कारण यावेळी गुजरातच्या आठ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यामुळेच गुजरातचा संघ हा ८९ धावांत ऑल आऊट झाला.

दिल्लीकडून यावेळी सर्वात यशस्वी ठरला तो कर्णधार ऋषभ पंत. कारण पंतने यावेळी दोन झेल आणि दोन स्टम्पिंग्स केल्या. दिल्लीकडून यावेळी सर्वाधिक विकेट्स मुकेश कुमारने मिळवल्या. मुकेशने यावेळी २.३ षटकांत फक्त १४ धावा दिल्या आणि तीन बळी मिळवले. मुकेशला यावेळी इशांत शर्माने दोन बळी मिळवत चांगली साथ दिली. या दोघांनी यावेळी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T17:09:34Z dg43tfdfdgfd