'देव' पावला... देवदत्त पडीक्कल संघर्षानंतर दोन वर्षांनी मैदानात उतरला आणि रचला दमदार विक्रम

गोपाळ गुरव : देवदत्त पडीक्कलचा हा पहिलाच कसोटी सामना होता. पडिक्कलला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या आर. अश्विनच्या हातातून कसोटी कॅप देण्यात आली. मागील दोन वर्षांपासून देवदत्त भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होता. अखेर २३ वर्षीय देवदत्तचे स्वप्न साकार झाले.

देवदत्तला २०२१मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत आंतरराष्ट्रीय टी-२०त पदार्पण करता आले. मात्र, त्याचा कारकिर्दीचा आलेख काही चढता राहिला नाही. करोनामुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. त्याच पोटाच्या समस्येमुळे तो मागे पडला. त्याचे प्रशिक्षक इरफान सैत म्हणाले, ‘मागील दोन वर्षे देवदत्त तंदुरुस्त राहण्यासाठी संघर्ष करीत होता. पोटाच्या विकारामुळे त्याचे वजनही घटले होते. आम्ही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होतो. डॉक्टरांचाही सल्ला घेत होतो.’

बेंगळुरूत दाखल

देवदत्तचा जन्म केरळमधील इडापल येथील. तो अकरा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब वैयक्तिक कारणास्तव हैदराबादवरून बेंगळुरूत आले. क्रिकेटची आवड असल्याने त्याला कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेटमध्ये दाखल करण्यात आले. त्याचे शिक्षण झाले ते सेंट जोसेफ बॉइज स्कूलमधून. याच स्कूलमधून भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे शिक्षण झाले. विशेष म्हणजे त्यांच्या प्रशिक्षक कालावधीतच देवदत्तचे कसोटीत पदार्पण झाले.

२०२१मध्ये फॉर्मात

क्लब क्रिकेटमध्ये चमक दाखवून तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आला होता. कर्नाटक संघाकडून तो खेळत होता. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडकमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने भारतीय टी-२० संघातही प्रवेश मिळवला होता. सय्यद मुश्ताक अली करंडकमधील पाच टी-२० लढतींत त्याने ११९ धावा केल्या. यानंतर विजय हजारेमधील पाच सामन्यांत त्याने दोन शतकांसह ४६५ धावा चोपल्या. यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने ९२.६६च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. यात तीन शतकांचाही समावेश आहे. अहमदाबाद येथे इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळताना त्याने १०५ धावांची खेळी केली. चेन्नईत तमिळनाडूविरुद्ध केलेल्या १५१ आणि पंजाबविरुद्ध १९३ धावांची जबरदस्त खेळी केली. धावांच्या खेळीने निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्यानंतर आपल्या कसोटी पदार्पणात देवदत्तने अर्धशतक करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

क्रिकेट शिवाय काहीच नाही

प्रशिक्षक सैत म्हणाले, ‘क्रिकेटशिवाय त्याने आयुष्यात कसलाही विचार केला नाही. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो १४, १६, १९ वर्षांखालील गटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये अव्वल होता. फलंदाजीचे तंत्र आत्मसाथ करून घेण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. यानंतर दुखापतीमुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली होती. मात्र, त्यावरही त्याने मात केली.’ कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये छाप पाडल्यानंतर त्याने आयपीएलही गाजविले. आयपीएलमध्ये २०२०च्या मोसमात त्याने १५ सामन्यांत ४७३, तर २०२१मध्ये ४११ धावा केल्या. एकूण ५७ आयपीएल सामन्यांत त्याने १५२१ धावा केल्या आहेत.

सुरुवातीच्या दोन मोसमांत तो बेंगळुरू संघात होता. यानंतर २०२२च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला मोठ्या रकमेत खरेदी केले.

2024-03-08T09:58:48Z dg43tfdfdgfd