धोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची INSTA स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक

Rohit Sharma First Reaction On Dhoni Leaving CSK Captaincy: 'मुंबई इंडियन्स'प्रमाणेच धक्का तंत्राचा वापर करत चेन्नईच्या संघाने आपल्या नेतृत्वामध्ये आयपीएल 2024 चं पर्व सुरु होण्याच्या काही तास आधी बदल केला. फरक इतकाच की मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला संघ व्यवस्थापनाने पायउतार होण्यास सांगितलं तर दुसरीकडे गुरुवारी (21 मार्च 2024 रोजी) महेंद्रसिंह धोनी स्वत: पायउतार झाला. धोनीनं कर्णधारपद 27 वर्षीय सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. यासंदर्भातील घोषणा चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. ट्रॉफीबरोबरच्या फोटोशूटसाठी धोनीऐवजी चेन्नईकडून ऋतुराज उपस्थित होता. धोनीच्या या तडकाफडकी निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून यामध्ये मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. रोहितने धोनी कर्णधारमधून पाय उतार झाल्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहितलाही कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं

धोनीच्या आधी रोहित शर्मालाही कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्याने त्याच्या नाराजीची चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वाच्या आधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सकडून प्लेअर ट्रेडअंतर्गत हार्दिक पंड्याला पुन्हा मुंबईच्या संघात स्थान दिलं. त्यानंतर अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून त्याच्याजागी हार्दीक पंड्याची नियुक्ती केल्याने मोठा वाद निर्माण झाला. मागील अनेक वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला अचानक कर्णधार घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. याच रोहितने धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर इन्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. 

रोहितने शेअर केली खास पोस्ट

रोहितने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तो स्वत: मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसत आहे. तर धोनी चेन्नईच्या संघाच्या जर्सीत दिसत आहे. दोघेही मैदानात हस्तांदोलन करताना पाहायला मिळत आहे. या फोटोखाली रोहित शर्माने हॅण्डशेक करत असल्याचा इमोजी पोस्ट केला आहे. एकप्रकारे या फोटोच्या माध्यमातून रोहितने धोनीच्या उत्तम करिअरसाठी त्याचं अभिनंदनच केलं आहे. रोहितच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ >> 'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया

चाहते झाले भावूक

रोहितने शेअर केलेला हा फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दोन्ही फार कर्तुत्ववान कर्णधार पायउतार झाल्याने यापुढे आयपीएल कधीच पूर्वीसारखं वाटणार नाही, असं म्हणत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. अन्य एकाने या दोघांमधील बॉण्ड फारच उत्तम असल्याचं म्हटलं आहे.

1)

2)

ऋतुराज सीएसकेसाठी खेळलाय 52 आयपीएल सामने

दरम्यान, ऋतुराज पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आज मैदानात उतरणार आहे. ऋतुराज 2020 पासून या संघातून खेळतोय. त्याने आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळले आहेत. आता तो थेट कर्णधार म्हणून मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे.

2024-03-22T03:42:37Z dg43tfdfdgfd