धोनीशी तुलना करताच ऋतुराजने एका वाक्यात विषय संपवला; उत्तर ऐकण्यासाठी पाहा व्हिडिओ

चेन्नई: आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होत आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात चेन्नईच्या कर्णधारपदाची सूत्रे ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहेत. महेंद्र सिंह धोनीने चेन्नईला विक्रमी ५ विजेतेपद मिळून दिली आहेत. आता संघाला पुढे नेण्याची जबाबदारी ऋतुराजची आहे.

पहिल्या लढतीच्या एक दिवस आधी चेन्नईने नव्या कर्णधाराची घोषणा केली. तेव्हापासून ऋतुराज सीएसकेचे नेतृत्व कसे करेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आज जेव्हा ऋतुराज मैदानावर आला तेव्हा चेन्नईच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. टॉसच्या वेळी जेव्हा ऋतुराजकडे माइक आला तेव्हा देखील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. कर्णधारपदाची नवी जबाबदारी कशी वाटते या रवी शास्त्रींच्या प्रश्नावर ऋतुराजने अभिमानास्पद असे उत्तर दिले. त्याच बरोबर कर्णधार म्हणून तो कशा काम करणार हे देखील ऋतुराजने स्पष्टपणे सांगून टाकले.

रवी शास्त्रींनी धोनीशी तुलना करत कर्णधापदाबाबतचा प्रश्न विचारताच ऋतुराजने मी माझ्या ठिकाणी राहून जबाबदारी पार पाडेन, याआधीच्या कामगिरीच्या दबावात न राहण्याचा प्रयत्न असेल (मी माझ्याच शूज(बूटा)मध्ये राहण्याचा प्रयत्न करेन, माईभाई(धोनी)च्या शूजमध्ये न राहण्याचा प्रयत्न असेल), अशा शब्दात ऋतुराजने स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. पुढे तो म्हणाला, गेल्या वर्षी त्याने (धोनीने) मला कर्णधारपदाबाबतचे संकेत दिले होते. तसेच या सामन्यात समीर रिझवी पदार्पण करणार असल्याचे तो म्हणाला.

कर्णधार म्हणून ऋतुराजने पहिल्याच सामन्यात धोनीच्या नेतृत्वाने आतापर्यंत तयार केलेल्या वलयाचा कोणताही दबाव न घेता खेळणार असल्याचे स्पष्ट केले. धोनी हा फक्त चेन्नईचा नाही तर आयपीएलच्या इतिहासातील आघाडीचा यशस्वी कर्णधार आहे. तर चेन्नई संघाच्या चाहत्यांची संख्या देखील सर्वाधिक अशी आहे. त्यामुळेच ऋतुराजवर मोठी जबाबदारी आहे आणि तो ती कशी पार पाडतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ऋतुराज २०१९ साली चेन्नई संघात आला होता. पण त्याला २०२० मध्ये प्रत्यक्षात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. प्रथम मधळ्या फळीत अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली.

2024-03-22T15:50:34Z dg43tfdfdgfd