पंतने आतापर्यंत जे केले नाही ते यावेळी करून दाखवलं, दिल्लीच्या सामन्यापूर्वी मोठी गोष्ट समोर

चंडीगड : गेल्या वर्षीच्या अपयशी कामगिरीतून दिल्ली कॅपिटल्सने किती धडे घेतले आहेत हे आज, शनिवारी कळेल. आयपीएल लढतीत त्यांचा सलामीचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. मात्र, लढत आयपीएलची असली, तरी साऱ्यांचे लक्ष ऋषभ पंतवर असेल. पंतने जे आतापर्यंत आयपीएलमध्ये केले नाही ते यावेळी केल्याचे संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी सांगितले आहे. ही लढत चंडीगढच्या मुल्लनपूर येथील नव्या महाराजा यदाविंद्रसिंग क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक यांनी पंतबाबत सांगितले की, " पंतने गेल्या आठवड्यात फलंदाजीचा एवढा सराव केला आहे जेवढा त्याने आतापर्यंतच्या आयपीएलला सामोरे जातानाही केला नसेल! त्याला आपला पूर्वीचा शारीरिक फिटनेस पुन्हा मिळवायचा आहे."

डिसेंबर २०२२मध्ये भीषण मोटर अपघातातून पंत थोडक्यात बचावला. यातून झपाट्याने सावरून तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पंतचा फिटनेस पाहूनच त्याला यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिकांसाठी तज्ज्ञांकडून परवानगी लाभली आहे. यामुळे पुन्हा एकदा पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले होते. अर्थात, परवानगी मिळाली असली, तरी ऐन सामन्यात पंत यष्टीरक्षण करणार की नाही ते अद्याप दिल्ली संघव्यवस्थापनाने निश्चित सांगितलेले नाही.

दिल्लीची बाजू कशी आहे, जाणून घ्या...

- गेल्या १५ महिन्यांत पंत आव्हानात्मक उपचार; तसेच खडतर सरावाला सामोरा जात नव्याने सज्ज झाला आहे.

- २०२०मध्ये मिळालेले उपविजेतेपद हीच काय ती दिल्लीची सर्वोत्तम आयपीएल कामगिरी.

- पंतने यष्टिरक्षणाची भूमिका बजावली नाही, तर ही जबाबदारी विंडीजचा शाय होप किंवा द. आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सकडे जाऊ शकते.

- कसोटीतून निवृत्त झालेला वॉर्नर दिल्लीकडून टी-२० चमक दाखविण्यास आतूर.

- पृथ्वी साव, मिचेल मार्श, पंत आणि स्टब्स असे फलंदाज दिल्लीच्या गोटात आहेत.

- दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा अॅनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, मुकेशकुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल.

पंजाबची बाजू कशी आहे...

- दिल्लीप्रमाणे पंजाबलाही अद्याप आयपीएल जिंकता आलेली नाही.

- २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती; पण कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला.

- गेल्या चार आयपीएल मोसमात हा संघ सलग सहाव्या क्रमांकावर घसरतो आहे.

- कर्णधार शिखर धवन इर्षेने कामगिरी करण्यात उत्सुक आहे; कारण तरुणांच्या शर्यतीत मागे पडून त्याने भारतीय संघातील स्थान गमावले आहे.

- जितेश शर्माच्या रूपाने पंजाबला नवा उपकर्णधारही लाभला आहे; पण बेअरस्टोची सध्या 'थंड' असलेली बॅट त्यांच्या चिंतेत भर घालते आहे.

- सिकंदर रझा, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऋषी धवन यांच्यासारखे अष्टपैलू पंजाबकडे आहेत.

- गोलंदाजीत कॅगिसो रबाडा याला अर्शदीपसिंग, हर्षल पटेल आणि नॅथन एलिस यांची साथ लाभेल.

- एकजूट होऊन प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करण्यात पंजाब संघ कायम कमी पडतो.

नवे स्टेडियम

महाराजा यदाविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील ही पहिलीच आयपीएल लढत आहे. येथे अद्याप आंतरराष्ट्रीय सामनाही झालेला नाही. यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीचा फारसा अंदाज येत नाही. मात्र, ही खेळपट्टीही येथील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या खेळपट्टीसारखी गोलंदाजांना सहायक असेल, असा अंदाज आहे.

दिल्ली वि. पंजाब

वेळ : दुपारी ३.३० पासून

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

ठिकाण : महाराजा यदाविंद्र सिंग स्टेडियम, चंडीगड.

आमने-सामने : एकूण सामने ३२, पंजाबचे विजय १६, दिल्लीचे विजय १५, एक लढत बरोबरीत.

2024-03-23T07:37:08Z dg43tfdfdgfd