फक्त या एका गोष्टीमुळे हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार झाला; सिद्धूंनी बंद खोलीतील चर्चा जगासमोर आणली

मुंबई: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४च्या पहिल्या ३ लढतीत पराभव झालाय. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स नंतर सनरायझर्स हैदराबाद आणि सोमवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सकडून मुंबईला पराभव स्विकारावा लागला.

आयपीएलच्या लिलावाआधीपासून हार्दिक पंड्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पंड्या अधिक चर्चेत आला. रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इतक नाही तर अनेक माजी क्रिकेटपटू देखील हैराण आहेत.

आयपीएल २०२४ मध्ये माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा समालोचन करत आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर सिद्धू यांनी थेट मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला सवाल केला. अखेर रोहित शर्माने अशी कोणती चूक केली होती ज्यामुळे त्याला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. ही गोष्ट कोणालाच पटत नाही की भारताचा हिरो, भारताचा कर्णधार असून देखील तो आयपीएलमध्ये कर्णधार नाही. चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की, त्याची चूक तरी काय? असे सिद्धू म्हणाले.

मुंबई इंडियन्सकडून खरच मोठी चूक झाली?

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार कहून मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने मोठी चूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या आधी अशी देखील चर्चा होती की, हार्दिक भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. हार्दिकला दुखापत होण्याआधी तो टी-२० संघाचे नेतृत्व करत देखील होता. त्यामुळे या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये हार्दिक संघाचे नेतृत्व करेल अशी शक्यता वाटत होती. इतक काय तर आयसीसीच्या पोस्टरमध्ये हार्दिकचा फोटो प्रसिद्ध झाला होता. पण बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहित शर्मा भारताचा कर्णधार असेल असे स्पष्ट केले.

सिद्धू यांच्या मते, बीसीसीआयने ही घोषणा जर आधी केली असती तर कदाचीत मुंबई इंडियन्सने रोहितच्या जागी कर्णधार म्हणून हार्दिकला कर्णधारपद दिले नसते. जर ऑक्टोबरमध्ये याची घोषणा केली असती की रोहित शर्माच २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार असेल तर मुंबई इंडियन्सने असा निर्णय घेतला नसता. कारण मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने असा विचार केला असावा की, भारताचा कर्णधार हा आयपीएलच्या संघाचा कर्णधार का होऊ शकत नाही. आता परिस्थिती अशी आहे की, हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनही फॉर्मेटमध्ये भारताचे नेतृत्व करतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-02T11:15:39Z dg43tfdfdgfd