भारतामधील कसोटीत पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, धरमशालाच्या टेस्ट मॅचमध्ये काय घडणार पाहा....

संजय घारपुरे : भारतामधील कसोटी सामन्यात जी गोष्ट आतापर्यंत कधीच झाली नाही, ती यावेळी पाहायला मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा गुरुवारपासून धरमशाला येथे रंगणार आहे. या कसोटीत एक गोष्ट अशी घडणार आहे, ज्याचा आनंद यापूर्वी भारताच्या चाहत्यांनी कधीच घेतला नसेल.

धरमशाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील भारताची पाचवी क्रिकेट कसोटी गुरुवारपासून (७ मार्च) धरमशाला येथे होणार आहे. या कसोटीच्या दरम्यान हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर सामन्याच्या आदल्यादिवशी एक अंश तर पहिल्या दिवशी जास्तीचे तापमान दोन अंश असू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हिमाचल प्रदेशात असलेल्या धरमशाला येथील वातावरण कायम थंड असते. त्यातच येथील हवामानात काही मिनिटांत मोठ्या प्रमाणावर बदल होतो. 'बीबीसी'च्या अंदाजानुसार बुधवारी कमीतकमी तापमान उणे एक, तर जास्तीचे तापमान चार अंश असेल. गुरुवारी म्हणजे सामन्याच्या पहिल्या दिवशी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर जास्तीत जास्त तापमान दोन अंश असण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त तापमान ४ अंश असेल. रविवारी म्हणजे चौथ्या दिवशी सर्वाधिक तापमान नऊ अंश असेल. हेच सामन्याच्या कालावाधीतील सर्वाधिक तापमान ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने कसोटीच्या आदल्या; तसेच पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, त्याच वेळी गुरुवारी राष्ट्रीय स्तरावरील हवामानाचा अंदाज वर्तवताना हिमाचल प्रदेशमध्ये हिमवर्षाव किंवा पाऊस होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे. हा इशारा सात मार्चपर्यंत आहे.

भारतीय संघातील खेळाडूंसाठी बोचरी थंडी त्रासदायक असली, तरी इंग्लंड संघ या हवामानामुळे सुखावण्याची शक्यता आहे. मात्र, वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या या वातावरणातील धरमशाला येथील एकमेव कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियास आठ विकेट राखून पराभूत केले होते. भारताने त्या कसोटीत भुवनेश्वरकुमार आणि उमेश यादव यांचीच निवड केली होती. त्यांनी केवळ सात विकेट घेतल्या होत्या. रवींद्र जडेजाची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. फिरकीला माफक साथ धरमशाला येथील खेळपट्टी फिरकीला माफक साथ देणारी असेल, असा कयास आहे. फिरकीला कमी साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे भारतीय संघाने हीच व्यूहरचना कायम ठेवली आहे. येथील खेळपट्टी सुरुवातीस वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन होती. मात्र, २०२२ मध्ये खेळपट्टी नव्याने तयार करण्यात आली.

या मोसमातील रणजी लढतीत पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २८८ आहे. पावसाळी वातावरणात; तसेच बोचऱ्या थंडीत ही कसोटी होईल. त्यामुळे चेंडू नवा असताना वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील. मात्र, चेंडूची लकाकी गेल्यावर त्यांना फारशी साथ मिळणार नाही, असा अंदाज आहे.

2024-03-06T07:23:08Z dg43tfdfdgfd