भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी...

धरमशाला : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. या पाचव्या सामन्यात इंग्लंडचे कोणते ११ खेळाडू खेळतील, हे आता स्पष्ट आहे.

इंग्लंडसाठी ही अखेरची संधी असेल. कारण हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील हा अखेरचा सामना असणार आहे. यापूर्वी या मालिकेत चार सामने झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला दुसरा सामना गमवावा लागला आणि त्यांची मालिकेवरील पकड ढिली झाली. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने तिसरा आणि चौथा कसोटी सामनाही गमावला. त्यामुळे सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ हा मालिकेत १-३ असा पिछाडीवर आहे. पण आता अखेरचा कसोटी सामना जिंकून इंग्लंडचा संघ मालिकाचा शेवट गोड करू शकतो. त्यामुळे या सामन्यात कोणता मोठा बदल केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात एकमेव मोठा बदल करण्यात आला आहे. धरमशालाची खेळपट्टी पाहून हा बदल इंग्लंडच्या संघात केल्याचे म्हटले जात आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघातून वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला वगळण्यात आले आहे. ऑलीला वगळून इंग्लंडच्या संघाने यावेळी वेगवान गोलंदाज मार्क वुडला या सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे. यापूर्वी वुडने या मालिकेत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे वुडचे या सामन्यात कमबॅक करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

धरमशालाचे वातावरण हे इंग्लंडसाठी पोषक असेल, असे म्हटले जात आहे. या सामन्यात हिमवृष्टी होऊ शकते असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे या सामन्यात खेळताना भारतापुढे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचा संघ कशी कामगिरी करतो आणि अखेरचा सामना जिंकतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. दुसरीकडे या वातावरणाचा इंग्लंडचा संघ कसा फायदा उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

2024-03-06T08:38:23Z dg43tfdfdgfd