'महागडे खेळाडू' असा उल्लेख करुन विराटचं नाव घेत सेहवाग म्हणाला, 'मी 17 वर्षात एकही..'

IPL 2024 Virender Sehwag On RCB Batting: एम. चेन्नस्वामी स्टेडियममध्ये मंगळवारी पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने बंगळुरुच्या संघाचा 28 धावांनी पराभव केला. यंदाच्या पर्वातील आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. चारपैकी 3 सामने गमावल्याने आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानी आहे. बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डीकॉकने केलेल्या 56 बॉल 81 धावांच्या जोरावर लखनऊच्या संघाने कोहलीच्या संघासमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं. लखनऊच्या संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावांपर्यंत मजल मारली. धावांचा पाठलाग करताना यजमान संघ 153 धावांवर ढेपाळला. आरसीबीच्या फलंदाजांपैकी महिपाल लोमरोर हा एकमेव फलंदाज ठरला ज्याने वैयक्तिक धावसंख्येमध्ये 30 धावांचा टप्पा ओलांडला.

आरसीबीच्या फलंदाजीचं विश्लेषण

आरसीबीच्या या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने मधल्या फळीतील फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असल्याने बंगळुरुच्या संघाला आता ए. बी. डिव्हिलिअर्सची आठवण होत असेल असं म्हटलं. "त्यांनी हे लक्ष्य गाठायला हवं होतं. मला वाटतं की ए. बी. डिव्हिलिअर्सच्या अनुपस्थितीचा त्यांना फटका बसतोय. अष्टपैलू खेळाडू असलेला कॅमेरॉन ग्रीन हा नव्याने समोर येत असलेला विश्वासू खेळाडू असून त्याने ऑस्ट्रेलियासाठी भन्नाट कामगिरी केली असली तरी आरसीबीकडून खेळताना त्याला चमक दाखवता आलेली नाही. त्याने मागील सामन्यात धावा केल्या हे नाकारता येणार नाही. तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदारला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रीनला पाठवण्यात आलं नाही. ग्लेन मॅक्सवेलही सातत्याने अपयशी ठरत आहे. तुम्ही त्याची आयपीएलमधील आकडेवारी पाहिली तर ती फारच उत्तम आहे. तुम्ही सर्वच्या सर्व 14 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी करत नसाल तर किमान 7 ते 8 सामन्यांमध्ये तरी सामना जिंकवून देणारी उत्तम खेळ करा," असं तिवारीने 'क्रिकबझ'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

महागड्या खेळाडूंनी किमान...

या चर्चेमध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागही सहभागी झाला होता. तिवारीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर सेहवागने, "7 ते 8 सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारी खेळी?" असा प्रश्न आश्चर्याने विचारला. सेहवागने पुढे, "7 ते 8 सामन्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या खेळी विराटलाही करता येणार नाही. प्रत्येक संघाला असं वाटतं की त्यांनी अधिक पैसे खर्च करुन विकत घेतलेल्या महागड्या खेळाडूंनी किमान 2 ते 3 सामन्यांमध्ये मोठी खेळी करावी. कोणत्याही खेळाडूने संघाला 2 ते 3 सामन्यांमध्ये जिंकवून दिलं तरी हे फार मोठं यश ठरेल," असं म्हणत आरसीबीच्या फलंदाजीवर खोचक टीका केली.

नक्की वाचा >> रवी शास्त्री हार्दिकच्या समर्थनार्थ मैदानात! मुंबईच्या चाहत्यांवर संतापून म्हणाले, 'तो सुद्धा एक...'

मागील 17 वर्षांमध्ये मी...

"खेळाडूला सातत्य राखता आलं पाहिजे. एका सामन्यात शतक झळकावलं. पुढल्या सामन्यात 80 धावा केल्या, असं काहीतरी. संघाला 7 ते 8 सामने जिंकून देणं हे एका वर्षात शक्य होऊ शकतं, आयपीएलमध्ये हे शक्य नाही. मी 17 वर्षांच्या आयपीएलमध्ये एकही असा खेळाडू पाहिला नाही ज्याने 7 ते 8 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळी केल्या आहेत," असं सेहवागने मत व्यक्त करताना म्हटलं.

2024-04-03T10:40:54Z dg43tfdfdgfd