मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या सामन्यासाठी जाहीर, हार्दिकने कोणाला दिली संधी जाणून घ्या...

अहमदाबाद : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या संघात कोणाला संधी दिली हे सांगितले. यावेळी हार्दिकने मुंबईच्या संघात फलंदाज आणि गोलंदाजांचा चांगला समन्वय ठेवला आहे.

हार्दिक पंड्याने यावेळी मुंबईचा संघ जाहीर करताना काही खेळाडूंची खासकरून नावं घेतली. यावेळी सात फलंदाज संघात असतील, असे हार्दिकने सांगितले आणि गोलंदाज कोण असतील, हेदेखील सांगितले.

मुंबई इंडियन्सचा संघ : इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चाला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड

राखीव खेळाडू: डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, विष्णू विनोद, नेहल वढेरा, मोहम्मद नबी.

हार्दिक पंड्यासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण हार्दिक पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. मुंबईने यापूर्वी पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे हार्दिक या सामन्यात कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.

हार्दिक पंड्याने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दोन मोसमांत गुजरात टायटन्स संघाला अंतिम फेरीत पोहोचविले. आता हार्दिक मुंबई इंडियन्स संघात आला आहे. मुंबईची सलामीची लढत आज, रविवारी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. हार्दिकला आपल्या जुन्या संघाच्या कमकुवत आणि जमेच्या बाजू माहिती आहेत. मात्र, रोहित शर्माच्या डोक्यावरील 'मुंबई'चा मुकुट परिधान करताना एक अतिरिक्त जबाबदारी हार्दिकवर असेल. तेव्हा या मोसमात हार्दिकच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

हार्दिकला वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाली होती. त्याच्या पायाचा घोटा दुखावला होता. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावे लागले होते. या दुखापतीतून तो सावरून पुनरागमन करणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली २०२२मध्ये गुजरातने विजेतेपद मिळवले होते, तर २०२३मध्ये गुजरात उपविजेता राहिला होता. आता पाच वेळेच्या विजेत्या मुंबईचे नेतृत्व त्याच्याकडे आले आहे. रोहित शर्मा हा हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. हा बदल मुंबईच्या चाहत्यांना फारसा रुचलेला नाही. त्यामुळे हार्दिकवर आपली निवड योग्य आहे, हे दाखवून द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर अष्टपैलू कामगिरीही त्याला करावी लागणार आहे. कारण जूनमध्ये लगेचच विंडीज-अमेरिकेत टी-२० वर्ल्ड कप आहे. आयपीएलच्या कामगिरीवरूनच वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व रोहितकडे सोपवायचे की हार्दिककडे, याचा निर्णय होणार आहे. दुसरीकडे, गुजरातचे नेतृत्व शुभमन गिलकडे आले आहे. त्याच्याही नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

या सामन्यात मुंबईचा संघ बाजी मारतो की गुजरातचा, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

2024-03-24T13:40:05Z dg43tfdfdgfd