मुंबई इंडियन्सच्या पराभवाला फक्त तू जबाबदार; भारताच्या दिग्गज खेळाडूने पाहा हार्दिकसाठी कोणते शब्द वापरले

नवी दिल्ली: आयपीएलचे ५ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हंगामातील पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने पराभव केला. या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करत होता हार्दिक पंड्या, जो गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. संपूर्ण सामन्यात हार्दिकवर सर्वांचे लक्ष होते आणि गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

कर्णधारपदामुळे हार्दिक चर्चेत होताच, त्याच बरोबर त्याने ज्या पद्धतीने नेतृत्व केले त्यावरून देखील सर्वांना हैराण केले. मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज असताना हार्दिक पंड्याने पहिली ओव्हर टाकली. आता पहिल्या लढतीतील पराभवानंतर हार्दिक पंड्यावर त्याच्या आयपीएलमधील माजी सहकारी आणि गुजरात टायटन्सचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीने हल्ला चढवला आहे.

आयपीएल २०२४च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या पराभवाला हार्दिक पंड्या जबाबदार असल्याचे शमीने म्हटले आहे. क्रिकबझवर दिलेल्या मुलाखतीत शमी म्हणाला, धावांचा पाठलाग करताना हार्दिकने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणे गरजेचे होते. असे झाले असते तर मॅच आधीच संपली असती. कर्णधार म्हणून हार्दिकने जबाबदारी घेतली पाहिजे होती. हार्दिक गुजरातकडून खेळताना तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे. त्यामुळे आता तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास काय अडचण आहे असा सवाल शमीने उपस्थित केला. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे... जणू हार्दिक टेलेंडर आहे. तुम्ही इतक्या खालच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करता तेव्हा प्रेशर घेता. जर तो वरच्या क्रमांकावर आला असता तर मॅच आधी लवकर संपली असती.

हंगामातील मुंबई इंडियन्सची दुसरी लढत उद्या २७ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

मोहम्मद शमी आयपीएल २०२४मध्ये खेळणार होता. मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर झाला. वनडे वर्ल्डकप २०२३नंतर शमी मैदानात दिसला नाही. ३३ वर्षीय शमीने २०१३ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. शमीने ११० सामन्यात ८.४३च्या इकॉनमीने १२७ विकेट घेतल्या आहेत.

2024-03-26T14:44:45Z dg43tfdfdgfd