मुंबई इंडियन्सला धुळ चारणाऱ्या हैदराबादचे पानीपत, गुजरातने साकारला दमदार विजय

अहमदाबाद : सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात धुळ चारली होती. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हैदराबादने आपल्या नावावर केला होता. पण रविवारच्या सामन्यात मात्र त्यांचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या एकाही खेळाडूला या सामन्यात अर्धशतकही झळकावता आले नाही. त्यामुळे हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्या अपयश आले आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाने त्यांच्यावर सात विकेट्स राखून दमदार विजय साकारला. हैदराबादच्या संघाने गुजरातपुढे विजयासाठी १६३ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करत गुजरातने या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी साकारली.

हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना तुफानी फटकेबाजी केली होती. त्यामुळे या सामन्यात हैदराबादचे फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला यावेळी १९ धावाच करता आल्या. दुसरीकडे मुंबई इंडियन्सविरुद्ध सामान गाजवणाऱ्या अभिषेक शर्माला २९ धावांवर समाधान मानावे लागले. हेनरीच क्लासिन आणि एडन मार्करम या दोन्ही फलंदाजांनीही यावेळी सपशेल निराशा केली. क्लासिनने यावेळी २४ धावा केल्या, तर मार्करमला १७ धावांवर समाधान मानावे लागले. एकंदरीत हैदराबादच्या फलंदाजांनी यावेळी चाहत्यांची घोर निराशा केली. त्यामुळे हैदराबादच्या संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा करता आल्या. गुजरातकडून यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

हैदराबादच्या १६३ धावांच्या आव्हानाचा सामना करताना गुजरातच्या संघाने दमदार सुरुवात केली. वृद्धिमान साहाने १३ चेंडूंत २५ धावा करत संघाता चांगली सलामी करून दिली. त्यानंतर शुभमन गिलने २८ चेंडूंत ३६ धावांची खेळी साकारली. त्यामुळे गुजरातचा संघ हा विजयाच्या मार्गावर परतला होता. गिल बाद झाला आणि त्यानंतर साई सुदर्शनने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-31T13:41:15Z dg43tfdfdgfd