मुंबईचे पुन्हा लोटांगण, लखनौने धुळ चारत साकारला आयपीएलमधील सहावा विजय

लखनौ : मुंबई इंडियन्सच्या संघाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला. लखनौच्या संघाने अचूक गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजीचे वस्त्रहरण केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला १५० धावाही करता आल्या नाहीत. मुंबईने लखनौपुढे १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने दमदार फलंदाजी करत ४ विकेट्स राखत विजय साकारला. एकिकडे लखनौचा हा सहावा विजय ठरला, तर मुंबईची पराभवाची हॅट्रीक झाली.

मुंबईच्या संघाने पहिल्याच षटकात लखनौला धक्का दिला. नुवान तुषाराने चौथ्याच चेंडूवर अर्शिन कुलकर्णीला शून्यावर बाद केले. पण त्यानंतर लखनौचा कर्णधार लोकेश राहुल आणि मार्कस स्टॉइनिस यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. हार्दिक पंड्याने यावेळी राहुलला २५ धावांवर असताना जीवदान दिले खरे, पण पंड्यानेच त्यानंतर राहुलला बाद करत आपली चूक सुधारली. राहुलने २२ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २८ धावा केल्या. राहुल बाद झाल्यावर स्टॉइनिस आणि दीपक हुडा यांनी चांगली भागीदारी रचली. पण दीपकला हार्दिकने १८ धावांवर बाद केले. दीपक बाद झाला तरी स्टॉइनिस मात्र दमदार फटकेबाजी करत होता.

स्टॉइनिसने यावेळी ३९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टॉइनिस आता लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत होते. पण मोहम्मद नबीने तिलक वर्माकरवी स्टॉइनिसला झेल बाद केले आणि मुंबईला मोठे यश मिळवून दिले. स्टॉइनिसने यावेळी ४५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. त्यानंतर लखनौने दोन विकेट्स झटपट गमावले आणि सामना रंगतदार झाला. पण अखेर लखनौनेच सामन्यात बाजी मारली.

मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच एकामागून एक धक्के बसले आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा चार धावांवर बाद झाला, तर सूर्यकुमार यादवला १० धावा करता आल्या. फॉर्मात असलेल्या तिलक वर्माला ७ धावांवर समाधान मानावे लागले. पण हार्दिक पंड्या तर यावेळी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा सहा षटकांत ४ बाद २७ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर ईशान किशन आणि नेहाल वधेरा यांची जोडी काही काळ जमली. पण ईशान ३२ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर वधेरा आणि टीम डेव्हिड यांनी संघाचा डाव सावरला. वधेराने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४६ धावा केल्या. डेव्हिडने यावेळी १८ चेंडूंत ३५ धावांची खेळी साकारली, त्यामुळेच मुंबई इंडियन्सला १४४ धावांचा पल्ला गाठता आला.

मुंबई इंडियन्सची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही आणि या गोष्टीचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसला. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी चार महत्वाचे विकेट्स गमावले आणि तिथेच त्यांच्या धावसंख्येला वेसण बसल्याचे पाहायला मिळाले. पण वधेरा आणि टीम डेव्हिड यांच्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-30T18:14:24Z dg43tfdfdgfd