मुंबईच्या विजयानंतरही रोहित शर्मा नाराज, ड्रेसिंग रूममध्ये रडू कोसळलं, हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव करत आयपीएल २०२४ मधील चौथा विजय नोंदवला. सामना जिंकूनही संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. रोहितला या परिस्थितीत पाहून चाहत्यांचेही मन हळहळले.

नेमकं काय घडलं?

रोहित शर्मा हा या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि म्हणूनच जेव्हा तो मैदानवर उतरतो तेव्हा चाहत्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून नेहमीच जास्त असतात. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा हा कर्णधार या हंगामात चमक दाखवू शकला नाही आणि यामुळे मुंबईच्या आतापर्यंतच्या विसंगत कामगिरीत भर पडली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो वानखेडेवर फलंदाजीसाठी उतरला होता. विजयासाठी १७४ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगली सुरुवात करता आली नाही आणि रोहित पाच चेंडू खेळत अवघ्या चार धावांवर बाद झाला. आणखी एका खराब धावसंख्येनंतर निराश होऊन रोहित डोके खाली घालून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये तो अश्रू ढाळताना दिसला.

गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहितचा फॉर्म घसरताना दिसत आहे. सीएसकेविरुद्ध त्याने शतकी खेळी केली असली तरी तेव्हापासून त्याचा फॉर्म कमी कमी होत चालला आहे. एसआरएच सोबतच्या सामन्यासह शेवटच्या पाच सामन्यांमध्ये त्याने ४, ११, ४, ८ अशी धावसंख्या नोंदवली. पाच सामन्यांत त्याला मात्र ३३ धावा करता आल्या आहेत. रोहितच्या या कामगिरीमुळे चाहते चिंतेत आहेत. टी-२० विश्वचषकाला केवळ एका महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

याबद्दल प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मिडियावर त्यांचे मत मांडत म्हणाले, रोहित शर्माचा फॉर्म आता चिंतेचा विषय बनला आहे. पहिल्या ७ सामन्यात २९७ धावा आणि त्यानंतरच्या ५ डावात मात्र ३४ धावा आल्या असून दमदार पणे शेवट करण्याची गरज आहे,' असे म्हटले आहे. आता रोहितला आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी अजून दोन सामने आहेत. त्यानंतर भारतीय खेळाडू अमेरिकेला रवाना होतील आणि ५ जूनपासून आयर्लंडविरुद्ध टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T15:10:41Z dg43tfdfdgfd