मुंबईला पहिला विजय कोणी मिळवून दिला, हार्दिकने सामन्यानंतर कोणाचं नाव घेत पाहा...

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पण हार्दिक पंड्याने यावेळी एकाच खेळाडूचे नाव घेतले आहे. हा खेळाडू आहे तरी कोण, हे हार्दिकने सामना संपल्यावर सर्वांना सांगितले.

सामना संपल्यावर हार्दिक पंड्या म्हणाला की, " एक विजेता कर्णधार बनणं हे सर्वांनाच आवडतं, माझ्यासाठी ही खास गोष्ट आहे. आम्ही भरपूर मेहनत घेतली. मानसीकता बदलण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. आम्ही संघात काही महत्वाचे बदल केले. पण हाच आमचा यापुढेही संघ असेल, हे मी तुम्हाला सांगूत शकत नाही. संघ व्यवस्थित स्थिरस्थावर व्हायला हवा, असे मला वाटते. आम्ही पहिले तीन सामने गमावले हे सर्वांनाच माहिती होते, पण मुंबई इंडियन्सचा संघ कमबॅक करेल, हा विश्वास सर्वांच्या मनात होता. एक विजय मिळवला तर संघाची गाडी रुळावर येईल, हे सर्वांनाच माहिती होते आणि तो पहिला विजय आम्हाला मिळाला आहे. मैदानातही आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला."

हार्दिक पुढे म्हणाला की, " यापूर्वी संघाची वाईट अवस्था सर्वांनीच पाहिली होती आणि आता चांगली वेळही ते पाहत आहेत. या सामन्यात सर्वांनीच चांगली फलंदाजी केली. फलंदाजीत एक चांगली लय आम्हाला सापडली. पण रोमारिओ शेफर्डचं नाव मी आवर्जुन घेईन. कारण त्याच्यामुळे आम्हाला हा विजय मिळवता आला, असे मला वाटते. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील मोठा फरक म्हणजे शेफर्डची धडाकेबाज खेळी होती. आम्हाला शेफर्डसारख्या खेळाडूंचा अभिमान आहे. या सामन्यात आमची गोलंदाजीही चांगली झाली. त्यामुळे माझ्यावर गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. आमच्यासाठी हा एक दमदार विजय आहे."

य सामन्यात शेफर्डने अखेरच्या षटकात ज्या ३२ धावा जमवल्या, त्या मुंबईसाठी महत्वाच्या ठरल्या. कारण मुंबईला याावेळी २९ धावांनी विजय मिळवता आला. त्यामुळे या सामन्यात शेफर्ड नसला असता तर कदाचित मुंबईला हा सामना गमवावा लागला असता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-07T14:57:24Z dg43tfdfdgfd