मॅच सुरू होण्याआधी ऐतिहासिक झाली रणजी ट्रॉफीची फायनल; ४१ विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई विरुद्ध विदर्भ लढणार

मुंबई: रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विदर्भाने मध्य प्रदेशवर ६२ धावांनी विजय मिळून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १० ते १४ मार्च या काळात होणाऱ्या अंतिम लढती विदर्भाची लढत ४१ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईशी होणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

विदर्भाच्या संघाने मध्य प्रदेशवर विजय मिळवला आणि यावेळची रणजीची फायनल ऐतिहासिक झाली. रणजी स्पर्धेच्या इतिहासात ५३ वर्षानंतर एका राज्यातील दोन संघात विजेतेपदाची लढत होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात अशी घटना फक्त दुसऱ्यांदा घडत आहे.

रणजी स्पर्धेत याआधी १९७१ साली असा योगायोग झाला होता. तेव्हा अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात लढत झाली होती. अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पराभव करून मुंबईने विजेतेपद मिळवले होते. यावेळी मुंबई ५३ वर्षापूर्वीचा इतिहास कामय ठेवणार की विदर्भ इतिहास बदलणार याची उत्सुकता असेल.

या अंतिम सामन्यात मुंबईचा संघ विक्रमी ४२वे विजेतेपद तर विदर्भाचा संघ तिसरे विजेतपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. विदर्भाच्या संघाने २०१७-१८ (दिल्लीचा पराभव) आणि २०१८-१९ (सौराष्ट्राचा पराभव) अशा सलग दोन हंगामात विजेतेपद मिळवली होती. तर मुंबईचे अखेरचे विजेतेपद २०१५-१६च्या हंगामात आले होते. तेव्हा त्यांनी सौराष्ट्र संघाचा पराभव केला होता. मुंबईचा संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी ४६ अंतिम लढतींपैकी ४१ लढती जिंकल्या आहेत.

2024-03-06T10:08:29Z dg43tfdfdgfd