योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...

Rohit Sharma Virat Kohli Retirement : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. टीम इंडियाच्या शिलेदारांनी तब्बल 11 वर्षांचा दुष्काळ संपवला अन् 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी निवृत्तीवर मोठं विधान केलंय. 

तुम्हाला गैरसमज झाला असेल तर... शरद पवारांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असं अजित पवार यांनी वारंवार म्हटलं होतं. अशातच रोहित आणि विराटच्या निवृत्तीवर बोलताना शरद पवारांनी टायमिंग साधलंय. शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अनेक मुद्दे मांडले. 

काय म्हणाले शरद पवार?

रोहित आणि विराट नक्कीच ग्रेट प्लेयर आहेत. त्यांनी या टप्प्यावर निवृत्तीचा निर्णय घेतला ही खूप उत्तम गोष्ट आहे, असं पवार म्हणाले. एका विशिष्ट काळानंतर खेळाडू आपला फॉर्म गमावून बसतात. मात्र, या दोघांनी उत्तम फॉर्ममध्ये असताना निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. या दोघांमुळे जागतिक पातळीवर टीम इंडियाची प्रतिष्ठा वाढली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली यासाठी दोघांनी निवृत्ती घेतलीये, त्यांची ही भूमिका अभिमास्पद असल्याचं शरद पवार म्हणतात.

टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. पण भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. पण गोलंदाजांनी अचूक काम केलं. तर द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले, असं शरद पवार म्हणाले.

पवारांकडून तिघांचं कौतूक

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शरद पवारांनी एक ट्विट केलं होतं. शेवटच्या ओव्हरपर्यंतचा थरार, 13 वर्षांनंतर एक अभिमानास्पद क्षण आहे, असं पवार म्हणाले होते. शरद पवारांनी यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार या तीन खेळाडूंचं कौतूक केलं होतं. 

2024-06-30T14:54:26Z dg43tfdfdgfd