रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अंतिम फेरीत धडक, मुंबई इंडियन्सला ५ धावांनी नमवलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या विजयानंतर स्मृती मंधानाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. त्याचवेळी हा जेतेपदाचा सामना रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. मात्र गत हंगामातील चॅम्पियन संघाचे दुसऱ्या सत्रात ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अंतिम सामन्याच्या एक पाऊल आधी ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला संघासाठी अत्यंत चुकीचा ठरत असल्याचे दिसत होते. संघाने पहिल्या ४ षटकांत २३ धावांवर तीन महत्त्वाचे विकेट गमावले. आरसीबीने सातत्याने विकेट गमावल्या, पण संघाची स्टार खेळाडू एलिस पेरीने एका टोकाला उभे राहून शेवटच्या षटकापर्यंत संघाला साथ दिली.

शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पेरी बाद झाली. पण तोपर्यंत संघाने सन्मानजनक धावसंख्या गाठली होती. संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १३५ धावा केल्या होत्या. यादरम्यान पेरीने ५० चेंडूत ६६ धावांची खेळी केली. पेरीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पेरीच्या शानदार खेळीनंतर ही धावसंख्या वाचवण्याची मोठी जबाबदारी संघाच्या गोलंदाजांवर आली. मुंबई इंडियन्स संघासमोर १२० चेंडूत १३६ धावांचे लक्ष्य होते.

परंतु त्यांचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून केवळ १३० धावा करू शकला आणि आरसीबीने सामना जिंकला. यादरम्यान मुंबईसाठी हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३३ धावा केल्या, परंतु तिने ही खेळी ३० चेंडूंवर खेळली, जी अतिशय संथ खेळी होती. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने २ तर एलिस पेरी, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

2024-03-15T18:03:23Z dg43tfdfdgfd