रोहित शर्माची एकाकी झुंज अपयशी, मुंबईचा विजयरथ अखेर चेन्नईने रोखला

मुंबई : रोहित शर्माचे तुफानी फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला जिंकवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रोहितने धमाकेदार फटकेबाजी केली खरी, पण त्याला अन्य एकाही फलंदाजाची चांगली साथ मिळाली नाही आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभव पत्करावा लागला. चेन्नईने मुंबईपुढे विजयासाठी २०७ धावांचे दिले होते. रोहितने धडाकेबाज सुरुवात केली खरी, पण मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले आणि रोहित एकाकी पडला. हा सामना जिंकून मुंबईच्या संघाला विजयी हॅट्रीक साकारता आली असती. पण चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईचा विजयरथ रोखला. रोहित शर्माने यावेळी शतक झळकावले पण मुंबईला हा सामना २० धावांनी गमवावा लागला. रोहित शर्माने यावेळी ११ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी साकारली.

रोहित शर्माने सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला यावेळी ७० धावांची सलामी मिळाली. यामध्ये फक्त २३ धावा या ईशान किशनच्या होत्या, बाकीच्या सर्व धावा रोहितने कुटल्या होत्या. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीषा पथिराणाने आपल्या पहिल्याच चेंडूवर ईशान किशनला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवकडून सर्वांनाच मोठा अपेक्षा होत्या. पण सूर्या यावेळी फक्त दोनच चेंडू खेळला आणि भोपळा न फोडता बाद झाला.

सूर्या बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने काही काळ रोहितला चांगली साथ दिली. तिलकने यावेळी २० चेंडूंत ५ चौकारांच्या जोरावर ३१ धावा केल्या. पुन्हा एकदा चेन्नईला हे तिसरे यश मिळवून दिले ते पथिराणाने. तिलक बाद झाला आणि कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. हार्दिकला यावेळी चंगली फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक यावेळी सहा चेंडू खेळला आणि त्याला फक्त २ धावाच करता आल्या. हार्दिक बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने कमी चेंडूंत जास्त धावा केल्या खऱ्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. टीमने यावेळी पाच चेंडूंच दोन षटकारांच्या जोरावर १५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रोमारिओ शेफर्ड फक्त एकच धाव करू शकला.

मुंबईच्या एकाही फलंदाजाला यावेळी रोहितला चांगली साथ देता आली नाही आणि हेच मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-14T18:25:34Z dg43tfdfdgfd