रोहित शर्माच्या मनात सध्या निवृत्तीचा विचार नाही; २०२७चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा, म्हणाला- देशाला...

नवी दिल्ली: ‘आणखी काही वर्षे तरी क्रिकेट खेळणार. माझी इच्छा आहे की, देशाला २०२७चा वर्ल्ड कप जिंकून द्यायचा...’ भारतीय क्रिकेट संघाचा ३६ वर्षीय कर्णधार रोहित शर्मा सांगत असतो. गेल्यावर्षी देशबांधवांच्या साक्षीने अहमदाबाद येथे वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची ध्येयपूर्ती होऊ शकली नाही, याची सल आजही या मुंबईकर फलंदाजाच्या मनात आहे. एका ऑनलाइन मुलाखतीत रोहित यासह काही विषयांवर मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

२००७मध्ये टी-२० चा पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात रोहितचा समावेश होता. मात्र त्या जगज्जेतेपदापेक्षा वनडे वर्ल्ड कपचे मोल अधिक आहे, असे त्याला वाटते. ‘माझ्या मनात निवृत्तीचा विचार नाही; पण आयुष्याची वळणे तुम्हाला कधी, कुठे घेऊन जातील सांगता येत नाही. मी सध्या चांगला खेळतो आहे आणि असेच आणखी काही वर्षे खेळण्याचा विचार आहे. त्यातही वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे माझे ध्येय आहे’, यूट्यूबवरील ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात रोहितने ही मनीषा व्यक्त केली.

‘वनडे वर्ल्ड कपच अस्सल वर्ल्ड कप आहे. या स्पर्धा बघूनच तर आम्ही लहानाचे मोठे झालो. यासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत २०२५मध्ये लॉर्ड्सवर रंगणार असून त्या सामन्यात धडक मारत विजयश्री मिळविण्याचे स्वप्नही आहेच...’, असे रोहितने सांगितले. यंदा विंडीज-अमेरिकेत संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्वही रोहित शर्माच करणार आहे.

-‘जिव्हारी लागणारी हार’

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या रोहितच्या टीम इंडियाला नेमका अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव रोहित आणि कंपनीच्या जिव्हारी लागला असून ती हार आज सहा महिने लोटल्यानंतरही रोहितला सलते आहे. ‘स्पर्धा भारतात रंगली होती. अगदी अंतिम फेरीपर्यंत आम्ही छान खेळलो. उपांत्य लढत जिंकल्यानंतर आमच्यासाठी जगज्जेतेपद अगदी एका पावलावर आले होते. अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी आम्हाला वर्ल्ड कप जेतेपदापासून दूर ठेवू शकत होती. खरोखर... अंतिम फेरीआधी मी सगळ्या शंकाकुशंका तपासल्याही होत्या’, रोहित काहीसा भावूक होत म्हणतो.

या मुंबईकर फलंदाजाकडे आज पराभवाचे कारण आहे. ‘आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एखादा वाईट दिवस येतो. जेव्हा हिशेब चुकतात, नियोजन फसते. मला वाटते, आमच्या आयुष्यातील तो अंतिम फेरीचा दिवस म्हणजे त्या एका वाईट दिवसासारखा होता. बघा ना, सगळे काही आलबेल होते. सगळे खूप छान खेळत होते, आत्मविश्वासही होता. मात्र त्या एका वाईट दिवसाने आम्हाला चकविले. ऑस्ट्रेलियासाठी मात्र तो दिवस फळला. अंतिम फेरीतही आम्ही वाईट खेळलो असे मला वाटत नाही’, रोहित विश्वासाने संघाची बाजू लावून धरतो.

-इंग्लंडविरुद्धच्या यशाने ‘मलमपट्टी’

अलीकडेच भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडला ४-१ असे लोळविले. मालिकेतील हे यश भारताने सहज मिळविल्यासारखे वाटते, पण त्यामागे मेहनत होती अन् याच यशाने रोहितच्या निराश मनावर मलमपट्टीही केली. ‘मैदानात उतरताना हातात तयार डावपेच असतातच; पण बऱ्याचदा सामन्यातील स्थितीनुसार स्वतःला आणि डावपेचांना बदलावे लागते. यंदा आमच्याविरुद्ध खेळणारा इंग्लंड संघ नव्या, वेगळ्या विचारांचा होता. प्रत्येक फलंदाज एक वेगळेच आव्हान उभे करत होता. अशावेळा आम्हाला मानसिकता बदलावी लागली,’ रोहित समजावून सांगतो. एखाद्या अव्वल संघाला आपल्याच मायभूमीत हरविण्याचा पराक्रमही परदेशातील मैदान मारण्याइतकाच मोठा असतो, असे रोहितला वाटते.

-पहिले कसोटी शतक...

कसोटी क्रिकेटमधील आवडता क्षण कोणता? या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित कारकिर्दीतील पहिल्या कसोटी शतकाची निवड करतो. विंडीजविरुद्धच्या मालिकेतील कोलकाता कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत रोहितने ३०१चेंडूंत १७७ धावा फटकावल्या होत्या. ती कसोटी मालिका सचिन तेंडुलकर यांची निरोपाची मालिका होती. ‘सचिन तेंडुलकर यांची ती १९९वी कसोटी होती. साहजिकच ईडनवर जवळपास ७० हजार प्रेक्षक उपस्थित होते. तो माहोल अंगावर रोमांच उभा करत होता. अशावेळी झालेले शतक खासच वाटते. मला वाटते तो माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणावा लागेल,’ असे रोहित नमूद करतो.

वॉर्नच्या आठवणींना उजळा

आयपीएलच्या निमित्ताने रोहितला शेन वॉर्नसारख्या महान क्रिकेटपटूसह (विरुद्ध संघात) खेळण्याची संधी मिळाली. ‘त्या सुरुवातीच्या आयपीएल मोसमांत शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत असे तर मी डेक्कन चार्जर्सकडून खेळायचो. त्याचे डोके क्रिकेटच्या दृष्टीने सुपीक होते. खेळाचा तो खूप वेगळ्या बाजूने विचार करत असे. त्याचा संघसहकारी गिलख्रिस्ट डेक्कनसाठी खेळायचा. तो शेन वॉर्नचे किस्से आम्हाला सांगत असे. समालोचन करतानाही पुढील दोन, तीन चेंडूंमध्ये काय होऊ शकते याचे अचूक भाकीत वॉर्न करायचा,’ रोहित एखाद्या चाहत्याप्रमाणे सांगतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-13T09:43:22Z dg43tfdfdgfd