रोहित शर्माने एका वाक्यातच विषय संपवला, पाचव्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या टीकेला दिले चोख उत्तर...

धरमशाला : पाचव्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वीच आता रोहित शर्माने इंग्लंडच्या संघाचे कान टोकले आहे. इंग्लंडच्या खेळाडूने भारतीय संघातील एका खेळाडूवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. रोहित शर्माने यावेळी इंग्लंडचे कान टोचत त्यांना चोख उत्तर दिले आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वाल हा भन्नाट फॉर्मात आहे. यशस्वीने या मालिकेत दोन द्विशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर यशस्वी हा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूने यशस्वी जैस्वालला लक्ष्य करण्याचे ठरवले. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट यावेळी म्हणाला की, " यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडकडून शिकत आहे." एकिकडे इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. इंग्लंडच्या एकाही खेळाडूला या मालिकेत यशस्वीसारखी कामगिरी करता आलेली नाही. पण तरीही डकेटने असं म्हटल्यावर रोहित शर्माने त्याला चांगलेच फटकारले आहे.

रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...

पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माची एक पत्रकार परिषद झाली. यावेळी रोहित शर्माला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने एका वाक्यात हा विषय संपवला. रोहित शर्माला हा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला की, " बेन डकेट एक गोष्ट बोलला. पण त्याने अजून ऋषभ पंतला खेळताना बघितलेले नाही." ऋषभ पंतने आतापर्यंत धडाकेबाज फटेकबाजी करत भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे ऋषभ पंतची फलंदाजी आतापर्यंत डकेटने बघितली नाही, असे म्हणत रोहितने डकेटसह इंग्लंडच्या संघाचे चांगलेच कान टोचले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण यापूर्वी इंग्लंडचा संघ यशस्वी जैस्वालवर दडपण आणण्याचा प्रयत्न रत होता. पण रोहित शर्माने आता इंग्लंडच्या या खेळाडूला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे आता यशस्वी जैस्वाल पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विरुद्ध खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-06T07:53:13Z dg43tfdfdgfd