रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरही मिळाला पुरस्कार, पाहा सामना संपल्यावर काय घडलं

अहमदाबाद : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर सहा धावांनी विजय मिळवला. पण मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरही रोहित शर्माला एक मोठा पुरस्कार मिळाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल, असे वाटत होते. कारण मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य नव्हते. मुंबई इंडियन्सला तीन षटकांत दोन धक्के बसले असले तरी रोहित शर्माने संघाचा डाव सावरला होता. रोहितने या दोन धक्क्यांमधून मुंबई इंडिन्सच्या संघाला बाहेर काढले होते. रोहितने तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारीही रचली होती. रोहितने ४३ धावांची खेळी साकारली होती, पण त्यापेक्षा जास्त धावा या मुंबई इंडियन्सच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने केल्या होत्या. रोहितच्या ४३ धावा होत्या, तर ब्रेव्हिसने ४६ धावा केल्या, पण तरीही यावेळी सामना संपल्यावर रोहित शर्माला खास पुरस्कार देण्यात आला.

रोहित शर्मा आयपीएलच्या या सामन्यात संघाचे नेतृत्व करत नव्हता. संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे होते. पण या सामन्यात रोहितला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर जेव्हा हार्दिक पंड्या अडचणीत सापडत होता तेव्हा रोहित शर्मा त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावत होता. रोहितने या सामन्यात हार्दिकला चांगले मार्गदर्शनही केले. त्यानंतर रोहितने धडाकेबाज फलंदाजीही केली. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचा डाव सावरला, पण एवढेच नाही तर आपल्या ४३ धावांमध्ये त्याने सात चौकार लगावले. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सपैकी एकाही खेळाडूला सात चौकार लगावता आले नाहीत. त्यामुळे या सात चौकारांच्या जोरावर रोहित शर्माला सामना संपल्यावर सामन्यातील सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार मिळाला, यासाठी रोख रक्कम होती ती १ लाख रुपये.

या सामन्यात रोहितच्या चौकारांच्या आसपासही कोणाला पोहोचता आले नाही. मुंबईकडून तर एकाही खेळाडूला चार चौकारही मारता आले नाहीत. गुजरात टायटन्सकडून फक्त सलामीवीर वृद्धिमान साहाने चार चौकार लगावले, पण त्यापेक्षा जास्त चौकार रोहित शर्मा वगळता एकाही फलंदाजाला मारता आले नाहीत. त्यामुळे या सामन्यातील सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार हा रोहित शर्माला देण्यात आला.

रोहित शर्माने या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला तारले होते. त्याला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याने संघाची गाडी विजयाच्या रुळावर आणली होती. पण रोहित बाद झाल्यावर एकाही मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करता आली नाही आणि त्यामुळेच या सामन्यात त्यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा या हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आता ते दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-24T19:40:39Z dg43tfdfdgfd