रोहितसाठी शतक नाही तर संघ महत्वाचा, ब्रेट ली मॅचनंतर असं का म्हणाला पाहा हिटमॅनचा व्हिडिओ

मुंबई : रोहित शर्माने शतक झळकावत मुंबई इंडियन्ससाठी एकाकी लढत दिली. रोहितने शतक झळकावले पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. पण रोहित शर्मासाठी शतक नाही तर मुंबई इंडियन्सचा संघ महत्वाचा आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाला माजी क्रिकेटपटू आणि समालोचक ब्रेट ली याने केले आहे. याबाबत रोहितचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये रोहितसाठी नेमकं काय महत्वाचं आहे, हे पाहायला मिळत आहे.

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघातून एकटाच फलंदाज करतो की काय, असे चित्र रविवारी झालेल्या वानखेडेवरील सामन्यात पाहायला मिळाले. कारण रोहित शर्मा एकाकी झुंज देत होता, पण त्याला मुंबईच्या एकाही फलंदाजाने चांगली साथ दिली नाही. त्यामुळे रोहितने शतक झळकावले असले तरी मुंबई इंडियन्सच्या संघाला विजय काही मिळवता आला नाही. पण रोहितचे शतक झाल्यावर त्यावर ब्रेट लीने जे भाष्य केले आहे, ते सर्वात महत्वाचे आहे.

ब्रेट ली म्हणाला की, " रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध दमदार शतक झळकावले. रोहितने शतक झळकावले हे मला आवडले, पण त्यापेक्षा रोहित शर्मासाठी एक गोष्ट मला जास्त आवडली. रोहित शर्माने जेव्हा शतक झळकावले तेव्हा रोहित शर्माने आपली बॅट उंचावली नाही. यामधूनच रोहित शर्मासाठी आपले शतक नाही तर संघाचा विजय महत्वाचा आहे, हे पाहायला मिळाले. रोहित पहिल्या चेंडूपासून चांगलाच खेळला. मैदानात सर्वत्र त्याने फटके मारले. रोहित शर्माचा फिटनेस यावेळी पाहण्यासारखा होता. रोहितने ६३ चेंडूंत नाबाद १०५ धावांची खेळी साकारली, पण त्याचे दुर्देव असे की, मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकता आला नाही."

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मागील लढतीत मुंबईने बेंगळुरूचे १९७ धावांचे लक्ष्य १५.३ षटकांत सहज साध्य केले होते. तर, त्याआधीच्या लढतीत वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध ५ बाद २३४ धावा फटकारल्या होत्या. त्यामुळे 'वानखेडे'वर मुंबई विजयाची हॅटट्रिक करणार, असे वाटत होते. रोहित शर्मा आणि ईशान किशनने ७ षटकांत ७० धावांची सलामीही दिली होती. मात्र, पथिरानाने एकाच षटकात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्याला खातेही उघडता आले नाही. सूर्या याच मैदानावर दिल्लीविरुद्धही शून्यावर बाद झाला होता. यानंतर रोहित आणि तिलक वर्माने मुंबईच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, ही जोडी फुटली आणि चेंडू-धावांतील अंतर वाढत गेले. त्यात रोहितला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड झटपट माघारी परतले. रोहितने ६३ चेंडूंत ११ चौकार व पाच षटकारांसह नाबाद १०५ धावा केल्या. मात्र, त्याची शतकी खेळी विजयासाठी पुरेशी ठरली नाही.

रोहित शर्मा जर यावेळी एका खेळाडूने तरी चांगली साथ दिली असती, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता नक्कीच होती.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T14:06:34Z dg43tfdfdgfd