लोकेश राहुलच्या फिटनेसवर असणार सर्वाचं लक्ष, लखनौ आणि राजस्थानमध्ये रंगणार धुमशान

जयपूर : बऱ्याच दिवसांनी लोकेश राहुल हा मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या लढतीत साऱ्यांचे लक्ष लखनौचा कर्णधार लोकेश राहुलच्या तंदुरुस्तीकडे असेल. दुखापतीतून सावरून लोकेश राहुल पुनरागमन करीत आहे. लखनौ सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज, रविवारी आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची लढत होणार आहे. संजू सॅमसनकडे राजस्थानचे नेतृत्व आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्याच लोकेश राहुल यशस्वी ठरतो का संजू सॅमसन याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

दुखापतीमुळे राहुल इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या चार कसोटींना मुकावे लागले होते. गेल्या वर्षी त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या वेळीही तो चार महिने क्रिकेटपासून लांब होता. लखनौचे नेतृत्व करण्यासोबतच त्याला धावांचेही योगदान द्यावे लागणार आहे. अर्थात, तो यष्टिरक्षण करणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. आगामी टी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन तो तंदुरुस्तीबाबत कुठलाही धोका पत्करणार नाही. दुसरीकडे राजस्थानचे कर्णधारपद संजू सॅमसनकडे आहे. यष्टिरक्षक-फलंदाज संजूचे लक्ष भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याचे असेल. त्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.

राजस्थान : राजस्थानकडे यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल असे आक्रमक फलंदाज आहेत. मधल्या फळीत विंडीजचे रोवमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर आहेत. आर. अश्विन आणि यझुवेंद्र चहल हे फिरकीचे 'मास्टर' संघात आहेत. रियान पराग, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदपी शर्मा असे पर्याय राजस्थानकडे आहेत.

लखनौ : लखनौ संघात क्विंटन डीकॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, लोकेश राहुल असे आक्रमक फलंदाज आहेत. रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार. देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, मयंक यादव, डेव्हिड विली, शिवम मावी असे पर्याय लखनौकडे आहेत.

लखनौ वि. राजस्थान

स्थळ : सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर

वेळ : दुपारी ३.३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमावरून

आमनेसामने

३ लढती

२ राजस्थानचे विजय

१ लखनौचा विजय

2024-03-24T09:39:43Z dg43tfdfdgfd