विचार फक्त भविष्याचाच, अजिंक्य रहाणेनं फायनलपूर्वी सांगितलं प्लॅनिंग, ते रेकॉर्ड वाढवणार ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे दीड वर्षानंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे; मात्र याचा विचार करण्यास किंवा त्यापूर्वीच्या कामगिरीचा, अपयशाचा विचार करण्यास तो तयार नाही. आयपीएलप्रमाणेच सकारात्मक आणि आक्रमक विचार ठेवून कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीस सामोरे जाण्याचे त्याने ठरवले आहे. काय झाले याचा विचार न करता पूर्णपणे नव्याने सुरुवात करणार असल्याचे त्याने सांगितले.

रहाणेचा अनुभव आणि कौशल्य या अंतिम लढतीत मोलाचे ठरेल. दडपणाखाली दीर्घ खेळी करण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या समावेशामुळे भारतीय फलंदाजीस जास्त स्थैर्य येईल, असा विचार करण्यात आला आहे. ‘जवळपास १८-१९ महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करीत आहे. यापूर्वी जे काही चांगले-वाईट घडले, त्याचा विचार मी करणार नाही. मी पूर्णपणे नव्याने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जे काही करीत आलो तेच करीत राहणार आहे,’ असे रहाणेने सांगितले. रहाणेने भारतीय संघांसह पोर्ट्समाउथ येथे सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळताना मी फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला. या मोसमात माझी फलंदाजी चांगली झाली. त्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही सातत्याने धावा केल्या होत्या. संघातील हे पुनरागमनामुळे काहीसा भावनाविवश झालो होतो, असे त्याने सांगितले.

भारतीय संघाबाहेर गेल्यावर खूपच निराश झालो होतो. त्या वेळी पुन्हा भारतीय संघांकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी कुटुंबीयांनी भक्कम साथ दिली. भारतीय संघात परतण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली. देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीकडे लक्ष दिले. संघातील पुनरागमनासाठी केलेल्या प्रयत्नाचा मी पुरेपूर आनंद घेतला. यशाने हुरळलो नाही, अपयशाने निराश झालो नाही. मुंबई संघातील प्रत्येक खेळाडूकडून शिकलो. क्रिकेटपटूस प्रत्येक दिवशी शिकावे लागते. हे शिकणे कधीही थांबणार नाही, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

Author: - अजिंक्य रहाणे

पाचव्यांदा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई संघाच्या यशात रहाणेचा मोलाचा वाटा होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेकांना खूश केले. त्याचा स्ट्राइक रेटही जबरदस्त होता. त्याने मुंबई इंडियन्सला २७ चेंडूंतच ६१ धावांचा चोप दिला होता. ‘आयपीएलमध्ये मी सकारात्मक होतो. एक लक्ष्य ठेवून फलंदाजी करीत होतो. हेच मी रणजी स्पर्धेतही केले होते. मी कसोटी खेळत आहे, की टी-२० याचा विचार न करता फलंदाजी करणार आहे. हा विचार करून विचारांची गुंतागुंत करण्याची माझी तयार नाही. काही गोष्टी सोप्या असणे हेच चांगले असते,’ असे तो म्हणाला.

रहाणेला ८२ कसोटींचा अनुभव आहे. त्यात त्याने ४ हजार ९३१ धावा केल्या आहेत. भारताने २०२०-२१ च्या मोसमात ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. त्यात रहाणेचा मोलाचा वाटा होता. त्या वेळी रहाणेच्या नेतृत्वाखाली रोहित खेळला होता. आता रोहित कर्णधार आहे. ‘संघातील वातावरण खूपच चांगले आहे. रोहित संघाला चांगल्या प्रकारे हाताळत आहे. राहुल भाईही हे चांगल्या प्रकारे करतात. प्रत्येक जण खेळाचा आनंद घेत आहे, त्याच वेळी सहकाऱ्यांच्या यशात अपयशात सहभागी होत आहे,’ असे तो म्हणाला.

इंग्लंडमधील आव्हान

- कणखरपणे परिस्थितीस सामोरे जाणे महत्त्वाचे

- इंग्लंडमधील यशासाठी परिस्थितीचा अभ्यास मोलाचा असतो.

- एकावेळी फार तर एका सत्राबाबतच विचार करता येतो

- खेळपट्टी कशी रंग बदलत आहे हे लक्षात घेताना हवामानातील बदलाकडेही लक्ष द्यावे लागते.

- सत्तर धावा झाल्यावरही आता जम बसला, सर्व काही जाणले असे गृहीत धरून चालत नाही

2023-06-04T04:07:44Z dg43tfdfdgfd