विजयी हॅट्रीकसाठी चेन्नई सज्ज, दिल्लीविरुद्ध ऋतुराजने संघात कोणात बदल केला जाणून घ्या...

विशाखापट्टणम : चेन्नईने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता तिसरा सामान जिंकून ते विजयाची हॅट्रीक साकारणार का, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपला संघ यावेळी जाहीर केला.

ऋतुराजने धोनीसारखाच आपल्या खेळाडूंवर विश्वास कायम ठेवला आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यासाठी ऋतुराजने चेन्नईच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. जो संघ दुसऱ्या सामन्यात होता तोच कायम ठेवण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या खूपच बहरात आहे. त्यांचा झंझावात रोखणे अद्याप संघही न स्थिरावलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच अवघड आहे. त्यामुळेच रविवारी होणाऱ्या या संघातील सामन्यास दोन असमान संघातील संघातील लढत असेच संबोधले जात आहे.

यंदाच्या स्पर्धेत दिल्लीचा दोन्ही सामन्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ हा गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे दोन्ही सामने जिंकलेले चेन्नई चार गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. आतापर्यंत दोन्ही संघांत एकमेकांविरुद्ध २९ सामन्यांत चेन्नईचे १९-१० असे वर्चस्व राहीलेले आहे. गेल्या पाचपैकी चार लढतींत चेन्नईची सरशी झाली आहे.

आजच्या सामन्यात पृथ्वी साव चित्र बदलेल, अशी दिल्ली चाहत्यांची आशा आहे. पृथ्वी सावला संघात घेऊन त्याच्याकडे सलामीची जबाबदारी सोपववली जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पहिल्या दोन सामन्यांत खेळलेला मिचेल मार्श तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. दिल्लीने यापूर्वीच्या चेन्नईविरुद्धच्या तीन लढतींत ९१, २१ आणि ७७ धावांनी हार पत्करली आहे. योग्य गुणवान खेळाडूंची निवड न केल्याचा दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. पण या सामन्यासाठी चेन्नई पुन्हा संघात बदल करण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

रणजी स्पर्धेत ९०२ धावा केलेल्या रिकी भुई याला दिल्लीने घेतले; पण त्याची परदेशी गोलंदाजांसमोर भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. रिकी भुईऐवजी यश धुलला खेळवण्याचा दिल्लीचा विचार करत आहे. डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द अंतिम टप्प्यात, ऋषभ पंत अद्याप बहरलेला नाही. शाय होप आणि ट्रिस्टन स्टब्स स्थिरावण्यास जास्तच वेळ घेतात. अक्षर पटेल वगळता दिल्लीच्या एकाही गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ७.५०पेक्षा कमी नाही. कुलदीप यादवची गोलंदाजी चांगली झाल्यास तो शिवम दुबेला रोखू शकेल, हीच दिल्लीला महत्त्वाची आशा असेल. इशांत शर्मा खेळल्यास दिल्लीच्या गोलंदाजीची धार वाढू शकते. राचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांचा धडाका रोखणे दिल्लीस कितपत जमणार हाच खरा प्रश्न असेल.

चेन्नई वि. दिल्ली

ठिकाण ः डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम

प्रक्षेपण ः संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

हवामानाचा अंदाज ः तापमान ३० अंश; पण त्यापेक्षाही ७८ टक्के आर्द्रता खेळाडूंचा चांगलाच कस पाहणार

खेळपट्टीचा अंदाज ः फलंदाजीसाठी पूर्णपणे अनुकूल; पण या मैदानावर फारशा द्विशतकी धावसंख्या झालेल्या नाहीत. येथील १३पैकी सात आयपीएल सामन्यांत धावांचा पाठलाग केलेल्या संघाचा विजय

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-31T14:11:36Z dg43tfdfdgfd