विराटची हकालपट्टी करुन रोहितला कर्णधार का केलं? सौरव गांगुलीने अखेर केला खुलासा, 'मला अजिबात...'

विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर बराच मोठा वाद निर्माण झाला होता. आपल्याला काहीही कल्पना न देता कर्णधारपदावरुन काढल्याचा आरोप त्याने केला होता. त्यावेळी माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होता. विराटने उल्लेख केला नसला तरी त्याचे आरोप थेट सौरव गांगुलीवर असल्याचं बोललं जात होतं. विराटने आयपीएलमधील एका सामन्यात सौरव गांगुलीसमोर केलेले हावभावही चर्चेचा विषय ठरले होते. विराट कोहली कसोटी आणि टी-20 च्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाला होता. दरम्यान सौरव गांगुलीने पहिल्यांदाच विराटच्या जागी रोहितला कर्णधार का केलं? याचा खुलासा केला आहे. याआधी त्याने आपण विराटला टी-20 चं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितल्याचं म्हटलं होतं. 

विराटच्या जागी रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करण्याच्या निर्णयावर सौरव गांगुली म्हणाला की, "मला रोहित शर्मामध्ये फार क्षमता दिसली. खासकरुन त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड पाहता ती जाणवत होती". रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ गतवर्षी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण दुर्दैवाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत तोंडचा घास हिरावून घेतला.

सौरव गांगुलीने वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ सर्वोत्तम होता अशी पावती देताना ज्याप्रकारे रोहितने संघाचं नेतृत्व केलं ते पाहून आश्चर्य वाटलं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. "रोहितने वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व कसं केलं ते पाहा. त्याने संघाला अंतिम सामन्यात नेलं होतं. अंतिम सामन्यात पराभूत होण्यापूर्वी भारतीय संघ स्पर्धेत सर्वोत्तम होता. त्यामुळे तो एक चांगला कर्णधार आहे यात शंका नाही".

पुढे त्याने सांगितलं की, "ज्याप्रकारे वर्ल्डकपमध्ये त्याने संघाचं नेतृत्व केलं ते पाहून मला आश्चर्य वाटलं नाही. मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो संघाचा कर्णधार झाला. त्याची कामगिरी पाहून मला आश्चर्य वाटत नाही. त्याच्यातील कौशल्य ओळखूनच मी त्याला कर्णधार केला, त्यामुळे त्याने आतापर्यंत जे केलं ते मला धक्का देणारं नाही".

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे. हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सलामीचा सामना गमावल्यानंतर, भारताने पुनरागमन करत तीन सामने जिंकले आहेत. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 3-1 ने आघाडीवर आहे. पाचवा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरु होणार आहे. 

दरम्यान आयपीएलमध्ये मात्र रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर करण्यात आलं आहे. मुंबईने ट्रेड करत हार्दिक पांड्याला संघात घेतलं असून, थेट कर्णधार केलं आहे. हार्दिकने मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना अनोखं यश मिळवून दिलं. पहिल्या हंगामात त्याने ट्रॉफी जिंकली तर दुसऱ्यात अंतिम सामना गाठला होता. अंतिम सामनाही गुजरात संघ थोडक्यात हारला होता, अन्यथा सलग दोन वेळा जिंकण्याची संधी होती. 

2024-03-03T13:28:44Z dg43tfdfdgfd