विराटच्या विरुद्ध बुमराहचा पंजा; पाचव्यांदा जसप्रीत बुमराहने दाखवला कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता

मुंबई: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध किंग कोहलीची बॅट अपयशी ठरल्याचे चित्र पहायला मिळालं. आजच्या सामन्यातील विराट कोहलीची विकेट चर्चेत आली आहे. आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने विराट कोहलीला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे. जसप्रीत बुमराहविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराटने आपली विकेट गमावली आहे.

आयपीएलच्या १७ व्या हंगामात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला मोठी सुरुवात देण्याची जबाबदारी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांच्या खांद्यावर होती. दोन षटकात केवळ १४ धावा झाल्या होत्या. मोहम्मद नबी आणि जेराल्ड कोएत्झी या फिरकीपटूंनंतर जसप्रीत बुमराहकडे तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी आली. त्याने पहिला चेंडू शॉर्ट टाकला, जो डॉट होता. दुसरा चेंडू इनस्विंग होऊन मांडीच्या पॅडला लागला, एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील फेटाळले गेले.

मात्र बुम-बूम बुमराहने तिसऱ्या चेंडूवर विराटला एकही संधी दिली नाही. गुड लेन्थवर टाकलेल्या वेगवान इनस्विंग चेंडूवर विराटला मागच्या पायावरून पुल शॉट मारायचा होता, पण चेंडू बॅटची आतील किनार घेऊन कीपरच्या डावीकडे गेला, जो इशान किशनने पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. शानदार डायव्हिंग झेल घेत मुंबईने बेंगळुरूला पहिला धक्का दिला. दरम्यान विराटने बुमराहच्या ९५ चेंडूंवर जबरदस्त स्ट्राईक रेटने १४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १५ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. बुमराहनेही त्याला पाच वेळा बाद केले आहे. बुमराहची आयपीएलमधील पहिली विकेट विराट कोहलीची होती. २०१३ साली पदार्पण करणाऱ्या बुमराहने विराटला बाद करून आपले खाते उघडले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T15:31:58Z dg43tfdfdgfd