विरेंद्र सेहवागने निवडला टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ; सर्वात मोठ्या खेळाडूला वगळले, पाहा कोणाला संधी दिली

नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड करण्याची वेळ जवळ आली आहे. २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळेल याची चर्चा सर्वजण करत आहेत. काही माजी खेळाडूंनी त्याच्या मते वर्ल्डकपचा संघ कसा असेल हे देखील सांगितले आहे. अशा खेळाडूंमध्ये भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला विरेंद्र सेहवागने टी-२० वर्ल्डकपसाठीची भारताची टीम निवडली आहे.

आयसीसीने वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करण्याची मुदत १ मे निश्चित केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती यांची बैठक या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत होण्याची शक्यता असून त्या बैठकीनंतर संघाची घोषणा होऊ शकते.

दरम्यान, आयपीएलचा १७वा हंगाम खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर आहे. यातील सर्वाधिक चर्चा होत आहे ती मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याची होय. हार्दिकच्या खराब फॉर्ममुळे त्याला टी-२० वर्ल्डकप संघात घ्यायचे ही नाही यावर चर्चा सुरू आहे. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने निवडलेल्या टी-२० वर्ल्डकप संघात हार्दिकला स्थान देण्यात आलेले नाही.

एका पॉडकास्टमध्ये सेहवागने यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांना सलामीवीर म्हणून निवडल्याचे सांगितले. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव ३ आणि ४ नंबवर येतील. सेहवागने या संघात विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतची निवड केली आहे. त्यानंतर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे या पैकी एकाची निवड करता येईल. सेहवागने या संघात रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची फिरकीपटू म्हणून निवड केली आहे. तर जलद गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा याची निवड केली आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी सेहवागने निवडलेला संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे किंवा रिंकू सिंह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T10:42:11Z dg43tfdfdgfd