व्यावसायिक कबड्डी : भारत पेट्रोलियम, बँक ऑफ बडोदाचे डबल धमाके

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी गतविजेत्या भारत पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा यांनी सलग दोन विजयांची नोंद करत बादफेरीत मजल मारली. तसेच युनियन बँक आणि मुंबई महानगर पालिकेनही प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव केला.

आज कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीतील गिरीश इरनाक, रिशांक देवाडिगा, निलेश शिंदेसारख्या खेळाडूंचा खेळ पाहाता आला. मात्र या तगड्या खेळाडूंसमोर दुबळे संघ असल्यामुळे त्यांचा आक्रमक खेळ पाहाण्याची संधी मिळाली नाही. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत सीताराम चव्हाण क्रीडानगरीत बीपीसीएलने ठाणे महानगर पालिकेला या सामन्यात कसलीच संधी दिली नाही. टीएमसी ना पकड करू शकले ना चढाईचे गुण मिळवू शकले. बीपीसीएलच्या चढाईपटूंना ना ते रोखू शकले ना. त्यांचे चढाईपटू बीपीसीएलचा कडेकोट बंदोबस्त भेदण्यात यशस्वी ठरले. बीपीसीएलने हा एकतर्फी सामना ३०-१० असा जिंकला तर दुसर्‍या सामन्यात जेएसडब्ल्यूचाही त्यांनी २६-१० असा फडशा पाडला. आकाश रुडले आणि शुभम शेळकेच्या चढायांचे जेएसडब्ल्यूकडे उत्तरच नव्हते. प्रतिस्पर्धी कमकुवत असले तरी बीपीसीएलचे दिग्गज त्यांच्यावर तुटून पडले नाहीत.

बँक ऑफ बडोदानेही मिडलाईन आणि आरबीआयचा पराभव करत बाद फेरीत सहज स्थान मिळवले. बँक ऑफ बडोदाने परेश हरड साहिल राणे यांच्या वेगवान खेळामुळे आरबीआयचा ३७-१७ असा धुव्वा उडवला. बडोद्याने पहिल्या सत्रातच १९-९ अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. मिडलाईन अ‍ॅकेडमीविरुद्धही बँक ऑफ बडोदाने ३१-१४ अशी विजयी आघाडी घेतली होती. मात्र दुसर्‍या सत्रात मिडलाईनच्या आदित्य ताठे, सुमीत गवळीने आक्रमक चढाया करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपेक्षित यश लाभले नाही आणि बँक ऑफ बडोदाने ४५-३५ असा विजय मिळवला.

अन्य लढतीत मुंबई महानगर पालिकेने अजित चौहान, अनुज गावडे यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर एपीएमसीला ४३-३१ असे नमवले. तसेच युनियन बँकेने पुण्याच्या संत सोपान सहकारी बँकेचा ४४-२१ असा फडशा पाडला. विजयी संघाच्या शुभम गायकवाड आणि अभिषेक निंबाळकर यांनी सुसाट खेळ केल्यामुळेच त्यांना मोठा विजय नोंदविता आला.

2024-03-07T12:26:29Z dg43tfdfdgfd