व्हेरॉक कप क्रिकेट : वेंगसरकर संघ अंतिम फेरीत, श्रावणचे धडाकेबाज शतक

पुणे : श्रावण राठोडचे शतक आणि अर्जुन गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाने तेरा वर्षांखालील गटाच्या व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत परंडवाल अकादमीवर ७७ धावांनी विजय नोंदवला आणि अंतिम फेरी गाठली.

वेंगसरकर अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना वेंगसरकर अकादमीने निर्धारित ४० षटकांत ३ बाद २४८ धावा केल्या. त्यात श्रावण राठोडने ११२ चेंडूंत वीस चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११७ धावांची, अर्जुन गायकवाडने ४५ चेंडूंत नऊ चौकारांसह ५५ धावांची, तर अरुणोदयसिंहने ६५ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना परंडवाल अकादमीचा डाव १७१ धावांतच आटोपला. मुदीत नांदलने ३१ चेंडूंत अकरा चौकारांसह ५१ धावांची, तर आयुष पतवारीने ८६ चेंडूंत सहा चौकारांसह ५९ धावांची खेळी करून झुंज दिली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत तन्मय कुलकर्णी, देवांश जुनावणे यांची अचूक गोलंदाजी आणि अर्जुन साळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ट्रिनिटी अकादमीने विराग अकादमीवर सहा विकेटनी मात केली. तन्मय, देवांश आणि अर्जुन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ट्रिनिटी संघाने विराग संघाचा डाव ९० धावांत रोखला. विहान सुतारने ३६ चेंडूंत दोन चौकारांसह २० धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना ट्रिनिटी संघाने १९व्या षटकात चार विकेटच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. यात अर्जुन साळेने ४६ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ५८ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : वेंगसरकर अकादमी ‘अ’ - ४० षटकांत ३ बाद २४८ (श्रावण राठोड नाबाद ११७, अर्जुन गायकवाड ५५, अरुणोदयसिंह ३९) वि. वि. परंडवाल अकादमी - ३५.३ षटकांत सर्व बाद १७१ (मुदीत नांदल ५१, आयुष पतवारी नाबाद ५९, अर्जुन गायकवाड २-२५, प्रज्योत गुंडळे २-२८, अर्जुन डोंगरे २-३१, आरुष पासलकर २-१२); विराग अकादमी - २२.४ षटकांत सर्व बाद ९० (विहान सुतार २०, आर्य कुमावत १८, तन्मय कुलकर्णी ४-१९, देवांश जुनावणे ३-५, अर्जुन साळे २-२४) पराभूत वि. ट्रिनिटी अकादमी - १८.५ षटकांत ४ बाद ९४ (अर्जुन साळे नाबाद ५८, ओजस अटलेकर २-२९, विहान सुतार १-१).

2024-03-15T14:33:01Z dg43tfdfdgfd