शाकिब अल हसनने ओलांडली मर्यादा, चाहत्यावर उचलला हात... VIDEO व्हायरल

Shakib Al Hasan Video: बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाकिब अल हसने गेली अनेक वर्ष बांगलादेशसाठी (Bangladesh) खेळतोय. 2006 पासून आतापर्यंत शाकिब बांगलादेशसाठी 67 कसोटी, 247 एकदिवसीय आणि 117 टी20 सामने खेळला आहे. आयसीसीच्या ऑलराऊंडर टी20 क्रमवारीत शाकिब अव्वल स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या आणि कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण आपल्या खेळापेक्षा शाकिब वादामुळेच अधिक चर्चेत असतो. 

चाहत्याला केली मारहाण

सोशल मीडियावर शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाकिब एका क्रिकेट चाहत्याला धक्काबुक्की करताना दिसत आहे. व्हिडिओत शाकिब अल हसन आपल्या दोन सहकाऱ्यांसह मैदानावर उभा असलेला दिसतोय. त्याचवेळी एक क्रिकेट चाहता त्याच्या जवळ येतो आणि त्याच्याबरोबर सेल्फीसाठी विनंती करतो. पण ही गोष्ट शाकिबला आवडलेली दिसत नाही. त्याने सेल्फी देण्याऐवजी चाहत्याच्या मानगुटीला धरून त्याला दूर ढकललं. इतकंच काय तर त्याला मारण्यासाठी हात उचलल्याचंही व्हिडिओत दिसतंय. ही घटना ढाका प्रीमिअर लीग दरम्यान घडल्याची माहिती मिळतेय.

ढाका प्रीमिअर लीगमध्ये शाकिब अल हसन शेख जमाल धनमंडी क्लबकडून खेळतोय. प्राइम बँक क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्याआधी एक चाहता शाकिब जवळ येऊन सेल्फीसाठी विनंती करतो. पण शाकिबने सेल्फी तर सोडाच शाकिबने त्या चाहत्याला नीट वागणूकही दिली नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सेल्फी द्यायची नव्हती तर स्पष्ट शब्दात नकार द्यायचा होता, एका चाहत्याला अशा प्रकारे धक्काबुक्की करत मारहाण करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न चाहते विचारतायत. 

शाकिबची क्रिकेट कारकिर्द

भारतात गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघ खेळला होता. या स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी निराशाजनक झाली. नऊ सामन्यांपैकी बांगलादेशला केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला होता. आता बांगलादेशचा संघ टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज होतोय.

2024-05-07T16:18:12Z dg43tfdfdgfd