सामना हरल्यानंतरही कोहलीसह RCBच्या खेळाडूंची पार्टी, फोटो पाहून चाहते संतापले, म्हणाले...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल २०२४ सीझन अत्यंत खराब जात आहे. बेंगळुरूला आता प्लेऑफमध्ये जाणे कठीण झाले आहे. संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांचा ८वा सामना खेळला. या रोमांचक सामन्यात बेंगळुरूला १ धावेने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीसह काही खेळाडू कोलकातामध्ये पार्टी करताना दिसले. पार्टीचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण टीमला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, वैशाख विजयकुमार, अनुज रावत आणि सुयश प्रभुदेसाई कोलकाता येथील वन८ कम्युन रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. वन८ कम्युन एक रेस्टॉरंट आहे. ज्याचा मालक स्वतः विराट कोहली आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या खेळाडूंचा हा फोटो हे पाहून चाहते नाराज आहेत. आयपीएल २०२४ मध्ये त्यांची टीम सर्वात वाईट कामगिरी करत असताना आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असूनही खेळाडू पार्टी करत आहेत, अशा प्रतिक्रिया चाहत्यांमधून येत आहेत. या व्हायरल फोटोवर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, "जेव्हा संघाने ७ पैकी ७ सामने गमावले आहेत, तेव्हा त्यांना हे सर्व करताना लाज वाटत नाही."

आयपीएल २०२४ मध्ये बेंगळुरूची आतापर्यंतची कामगिरी

आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एकच सामना त्याने जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्सचा निव्वळ रन रेट -१.०४६ आहे. दोन गुणांसह संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना २५ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२४ मधील हा ४१ वा सामना असेल. आयपीएल २०१४ मधील दोन्ही संघांचा शेवटचा सामना हा आतापर्यंतचा T20 स्वरूपातील सर्वाधिक धावा करणारा सामना होता, ज्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून ५४९ धावा केल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-24T12:25:13Z dg43tfdfdgfd