सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

Happy Birthday Sachin Tendulkar : क्रिकेट ज्यांचा धर्म आहे सचिन त्यांचा देव आहे. क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sacin Tendulkar) आज वाढदिवस. क्रिकेटमधून निवृत्ती (Retired) घेऊन बरीच वर्ष उलटली असली तरी सचिन नावाची जादू जराही कमी झालेली नाही. क्रिकेटमधले जवळपास सर्वच विक्रम सचिनच्या नावावर असून यातले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. यापैकीच एक अविस्मरणीय खेळी, ज्यानंतर भारतीयच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी त्याला क्रिकेटचा देव (God of Cricket) मानलं

शारजाहची ती अविस्मरणीय खेळी

22 एप्रिल 1998 म्हणजे वाढदिवसाच्या अगदी दोन दिवस आधीच सचिनने शारजाह स्टेडिअमवर (Sharjah Cricket Stadium) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) एक अविस्मरणीय खेळी केली. तेव्हा सचिन अवघ्या 25 वर्षांचा होता. ही खेळी आजही डेजर्ट स्टॉर्म (Desert Storm) नावाने ओळखली जाते. कोका-कोला कप स्पर्धेतला (Coca-Cola Cup) तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना होता. या सामन्यावर भारताचं अंतिम फेरीचं तिकिट निश्चित होणार होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होता स्टिव्ह वॉ. त्याने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मायकल बेवनने नाबाद 101 धावा तर मार्क वॉने 81 धावांची दमदार खेळी केली. या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 284 धावा केल्या. 

भारतासमोर कठिण आव्हान

भारतासमोर विजयासाठी 254 धावांची गरज होती. इतकंच नाही तर रन रेटही चांगला ठेवायचा होता, तरच भारत न्यूझीलंडला मागे टाकून अंतिम फेरीत पोहोचणार होता. सचिन तेंडुलकर सलामीला आला होता. भारतीय संघाने 29 ओव्हर्समध्ये चार विकेट गमावत 138 धावा केल्या होत्या आणि त्याचवेळी शारजाह स्टेडिअमवर धुळीचं वादळ सुरु झालं.

धुळीच्या या वादळाबद्दल सचिनने 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकात लिहिलं आहे. यात त्याने म्हटलंय, 'मी माझ्या आयुष्यात कधीच धुळीचं वादळ पाहिलं नव्हतं. मैदानात जोराची हवा सुटली होती. हे धुळीचं वादळ माझ्या सारख्या साडेपाच फूट उंचीच्या माणसाला उडवून तर घेऊन जाणार नाही ना अशी भीती मनात वाटत होती. मी ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टच्या पाठिशी जाऊन उभा राहिलो. म्हणजे जोरदार वाऱ्यात उडालोच तर गिलख्रिस्टला पकडून ठेवेन'

पण या वादळाने 25 वर्षांच्या सचिनच्या आत्मविश्वासावर जराही परिणाम झाला नाही. वादळ कमी झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला 17 ओव्हरमध्ये कमीतकमी 100 धावा करण्याचं आव्हान होतं. सचिनने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज टॉम मूडीला षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केलं. यानंतर शारजाहच्या मैदानावर जे घडलं ते केवळ अद्भूत होतं. धुळीचं वादळ थांबलं पण सचिन नावाचं वादळ इतकं सुसाट होतं की त्या वादळात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अक्षरश: पालापाचोळ्यासारखे उडून गेले.

सचिनने अवघ्या 131 चेंडूत 143 धावा केल्या, यात त्याने 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले. सचिनच्या या खेळीच्या जोरावर भारताने केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामनाच जिंकला नाही तर अंतिम फेरीतही प्रवेश केला. सचिनच्या या खेळीपुढे क्रिकेटप्रेमी सँड स्टोर्मही विसरले आणि या खेळीला सचिन स्टोर्म नाव पडलं. या खेळीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा महान फिरगी गोलंदाज शेन वॉर्नने म्हटलं होतं, सचिनचे षटकार मला स्वप्नातही घाबरवतात. सचिनची ही खेळी पंचवीस वर्षांनंतरही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. 

वाढदिवशी विजयाचं गिफ्ट

कोका-कोला कप स्पर्धेची अंतिम फेरी 24 एप्रिल म्हणजे सचिनच्या वाढदिवशीच होती. सचिनने 131 चेंडूत 134 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 खणखणीत षटकारांचा समावेश होता. या शतकी कामगिरीच्या जोरावर भारताने कोका-कोला कपचं जेतेपद पटकावलं. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतकं पूर्ण केली. पण ज्यावेळी त्याच्या शतकांची चर्चा होते, त्यावेळी शारजाहात केलेली सलग दोन शतकं आठवली जातात. 

2024-04-23T16:54:23Z dg43tfdfdgfd