सनरायझर्स हैदराबादने विजयाचे खाते उघडले, मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव

हैदराबाद: आज आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चढत झाली. या थरारक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दरम्यान मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत हैदराबादने एमआयसमोर २७८ धावांचे लक्ष्य ठेवले.

सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २४६ धावाच करू शकला आणि हैदराबादने ३१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत हैदराबादला कडवी झुंज दिली असली, तरी अखेर विजय एसआरएचच्या नावावरच राहिला. सनरायझर्स हैदराबादचा विजय त्यांच्या फलंदाजांनीच ठरवला. हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत सर्वाधिक नाबाद ८० धावा केल्या. क्लासेनच्या बॅटमधून ७ षटकार लागले. अभिषेक शर्माने २३ चेंडूत ६३ धावा केल्या. या खेळाडूने ७ षटकारही ठोकले. ट्रॅव्हिस हेडने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. याशिवाय एडन मार्करामने नाबाद ४२ धावा केल्या.

अनुकूल विकेटवर फलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांनीही आपली ताकद दाखवली. टिळक वर्माने ३४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. टीम डेव्हिडनेही नाबाद ४२ धावा केल्या. इशान किशनने १३ चेंडूत ३४ तर नमन धीरने १४ चेंडूत ३० धावा करत हैदराबादला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या संथ खेळीचा संघावर फरक पडला. पंड्याने केवळ १२० च्या स्ट्राईक रेटने केवळ २४ धावा केल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-27T18:02:16Z dg43tfdfdgfd