समोर विराट असता तर असाच निर्णय घेतला असता का? कैफचा कमिन्सला सवाल; धोनीचाही उल्लेख

Mohammad Kaif 2 Questions For Pat Cummins: इंडियन प्रिमिअर लीगमधील 17 व्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने आपल्या उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील निकालाबरोबरच चेन्नईची फलंदाजी सुरु असताना शेवटच्या षटकामध्ये घडलेल्या एका प्रकारावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. याच वादात आता भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने उडी घेत हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

नक्की घडलं काय

झालं असं की, 19 व्या ओव्हरला भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा जडेजाचा प्रयत्न होता. मात्र बॉल बॅटला लागून पुन्हा भुवनेश्वरकडे गेला. बॉल कुठे आहे हे न समजल्याने जडेजा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात समोरुन भुवनेश्वरने बॉल उचून जडेजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने मागे फिरताना पीच ओलांडून डावीकडून उजवीकडे तिरकी धाव घेत भुवनेश्वरचा स्टम्पचा व्ह्यू अडवला आणि भुवनेश्वरने फेकलेला बॉल जडेजाला लागला. आता हे असं जडेजाने मुद्दाम केलं की केवळ धावबाद होऊ नये म्हणून त्याच्याकडून नकळत हे झालं यावरुन वाद सुरु आहे.

तुम्हीच पाहा नक्की घडलं काय...

कैफची पोस्ट

मोहम्मद कैफने या प्रकरणावरुन सोशल मीडियावर एक पोस्ट करत हैदराबादच्या कर्णधाराला दोन प्रश्न विचारले आहेत. धोनीला मैदानाबाहेर ठेवण्यासाठी मुद्दाम ही अपील मागे घेतली का? तसेच टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट खेळत असता तरी तुझी भूमिका ही अशीच असती का? असं कैफने विचारलं आहे. "पॅट कमिन्ससाठी फिल्डींगमध्ये अडथळा आणण्यासंदर्भात जडेजाविरुद्धची अपील मागे घेतल्याबद्दल दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. धावांसाठी झगडणाऱ्या जडेजाला मैदानात कायम ठेऊन धोनीला आतच (फलंदाजीला न येऊ देता डगाऊटमध्येच) ठेवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय गोता का? टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली असता तर पॅट कमिन्सने असं केलं असतं का?" अशी पोस्ट कैफने केली आहे.

नक्की वाचा >> '157 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांकला BCCI दाखवतेय 'या' पाकिस्तानी बॉलरचे व्हिडीओ कारण..'

चेन्नईची सुमार कामगिरी

चेन्नईच्या फलंदाजांना सनरायझर्सच्या गोलंदाजांविरुद्ध धावा काढताना बरीच अडचण येत असल्याचं दिसून आलं. विशेष करुन शेवटच्या काही षटकांमध्ये चेन्नईची फलंदाजी फारच निराशाजनक राहिली. चेन्नईच्या संघाला कसाबसा 160 चा टप्पा ओलांडून 165 धावांपर्यंत मजल मारता आली.  चेन्नईकडून सध्या तुफान फलंदाजी करणारा शिवम दुबे हाच संघाकडून सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याने 24 बॉलमध्ये 45 धावा केल्या तर अजिंक्य रहाणेनेही 30 बॉलमध्ये 35 धावा करत त्याला साथ दिली. या दोघांनी मिळून 6.3 ओव्हरमध्ये केलेली 65 धावांची पार्टनरशीप एवढीच काय ती चेन्नईच्या फलंदाजीमधील जमेची बाजू ठरली. चेन्नईच्या संघाला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये केवळ 37 धावा करता आल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजांना धावा काढणं कठीण जात होतं. मात्र असं असतानाही डावाच्या शेवटाकडे चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा मैदानात टिकून राहिला आणि त्याने 23 बॉलमध्ये 31 धावा केल्या.

नक्की वाचा >> 29 बॉलमध्ये 61 धावा करुन सामना जिंकवणाऱ्या 'शशांक सिंह'मुळे प्रीती झिंटाला झालेला पश्चाताप, पण...

हा सामना हैदराबादने 6 विकेट्स राखून सहज जिंकला.

2024-04-06T07:46:52Z dg43tfdfdgfd