सूर्याने केली रोहित शर्माशी बरोबरी, दोन मित्रांमध्ये असं घडलंय तरी काय जाणून घ्या...

दिगंबर शिंगोटे : रोहित शर्मा आणि सूर्यकुामार हे दोघेही चांगले मित्र आहेत. या दोघांमध्ये कधीही वैर नसले तरी आता या दोघांची एका गोष्टीमध्ये बरोबरी झाली आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने तडाखेबंद शतक झळकावले. या धडाकेबाज कामगिरीसह सूर्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माशी बरोबरी केली.

यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी खालावली आहे. मुंबई संघ गुणतक्त्यात तळाला पोचला होता. घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सकडून मुंबई इंडियन्स संघ बारा वर्षांनंतर हरला. या पराभवातून सावरत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर सात विकेटनी विजय मिळवला. यात मोलाचा वाटा उचलला तो सूर्यकुमार यादवने. हैदराबादने मुंबईसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची पाचव्या षटकात ३ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. त्या वेळी मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागते की काय, असे अनेकांना वाटू लागले होते. मात्र, सूर्यकुमार यादवने लौकिकाला साजेसा खेळ करून मुंबईला अठराव्या षटकातच विजय मिळवून दिला. हे करीत असताना सूर्यकुमारने ५१ चेंडूंत बारा चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी केली. सूर्यकुमारलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

आयपीएलमध्ये आपले दुसरे शतक झळकावताना सूर्यकुमार यादवने एका बाबतीत सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, लेंडल सिमन्स आणि कॅमेरॉन ग्रीन यांना मागे टाकले आणि रोहित शर्माशी बरोबरी साधली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना यापूर्वी केवळ रोहित शर्मालाच आयपीएलमध्ये दोन शतके झळकावता आली आहेत, तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सचिन, जयसूर्या, सिमन्स आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत टी-२०मध्ये नऊ शतके झळकावली आहेत. त्यापाठोपाठ रोहित शर्मा (८), ऋतुराज गायकवाड (६), लोकेश राहुल (६) आणि सूर्यकुमार यादव (६) हे फलंदाज आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ हा जवळपास आयपीएलच्या बाहेर झाल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही मुंबईचा संघ अखेरच्या काही सामन्यांत दमदार कामगिरी करत असल्याचे समोर आले याहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-08T02:42:24Z dg43tfdfdgfd