'हा काय करतोय,' सुनील गावसकर संतापल्यानंतर सरफराज खानने मागितली माफी, म्हणाला 'पुन्हा कधी...'

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेमुळे भारतीय संघाला सरफराज खानसारखे दर्जेदार नवखे खेळाडू मिळाले आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सरफराज खानला फार वाट पाहावी लागली. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेच्या निमित्ताने त्याला अखेर संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर सरफराज खानने इंग्लंडविरोधातही आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सरफराज खानने पाच डावांमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. 

सरफराज खानकडे तीन अंकी धावसंख्या करण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी त्याने आपली विकेट गमावली होती. धरमशाला येथील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सरफराज खानने 60 चेंडूत 56 धावा केल्या. सरफराजने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. 

सरफराज खान मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच तिसऱ्या सेशनच्या पहिल्या चेंडूवरच बाद झाला. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. जो रुटने सरफराज खानचा झेल घेतला. पण त्याआधी सरफराज खान आणि देवदत्त पडीक्कल यांनी 95 धावांची भागीदारी केली होती. सरफारजची विकेट गेल्यानंतर भारताने लागोपाठ विकेट गमावले. 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर सरफराज खानच्या शॉर्ट निवडीवर नाराज होते. "चेंडू अत्यंत चांगला होता; हा फटका खेळण्यासाठी तो फारच शॉर्ट होता. तुम्ही तो खेळलात आणि किंमत मोजावी लागली. म्हणजे तू चहानंतर पहिला चेंडू खेळत आहेस. स्वत:ला थोडासा वेळ तरी दे. डॉन ब्रॅडमन मला म्हणाले होते की 'प्रत्येक चेंडूचा सामना करताना जरी मी 200 वर असलो तरी शून्यावर आहे असं समजून खेळत असतो.' आणि हा [सरफराज] सत्राचा पहिल्याच चेंडूवर असा शॉट खेळत आहे,” असं गावसकर समालोचन करताना म्हणाले होते.

सरफराज बाद झाल्यानंतर सुनील गावसकर इतके नाराज होण्यामागे कारण होतं. या दोघांनी कसोटीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी बराच वेळ गप्पा मारल्या होत्या. सुनील गावसकरांनी सरफराजला काही मौल्यवान सल्ले दिले होते. दुबईस्थित उद्योगपती श्याम भाटिया यांनी बैठक आयोजित केली होती आणि त्यांनी thenationalnews.com ला सांगितलं की, सरफराज खान विकेट गमावल्यानंतर फार नाराज होता. 

"सुनील गावसकर त्याला फटक्यांची निवड ही सर्वात महत्वाची बाब असल्याचं सांगत होते," अशी माहिती श्याम भाटिया यांनी दिली आहे. "हे फार महत्त्वाचं असतं. ते जवळपास 45 मिनिटं बोलत होते. पण सामन्यात चहापानानंतर तो लगेच बेदरकार फटका खेळत बाद झाला. सुनील गावसकर फार संतापले होते. तो काय करतोय असं त्यांनी समालोचन करताना म्हटलं. दुसऱ्या दिवशी सरफराज पुन्हा एकदा माझ्यासोबत होता. यावेळी त्याने मला सांगितलं की, सुनील गावसकरांकडे माझ्यातर्फे माफी मागा. मी चूक केली. पुन्हा अशी चूक होणार नाही," अशी माहिती श्याम भाटिया यांनी दिली. 

2024-03-13T11:10:50Z dg43tfdfdgfd