हार्दिक कसा होऊ शकतो मुंबईचा राजा, फक्त ही एकच गोष्ट त्याला आयपीएलमध्ये करावी लागणार

मुंबई : हार्दिक पंड्या हा सध्याच्या घडीला मोठ्या संकटात आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद तर मिळाले, पण त्याला जोरदार टीकाही सहन करावी लागत आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा, असे नारे प्रत्येक मुंबई इंडियन्सच्या सामन्यात पाहायला मिळतात. हार्दिकही मुंबईचा राजा होऊ शकतो, पण या संकटामधून बाहेर यायला हार्दिक पंड्याला एकच गोष्ट करावी लागेल.

हार्दिकने रोहितकडचे कर्णधारपद आपल्याला मागितले आणि तिथेच त्याने मोठी चूक केली. कारण रोहितने मुंबई इंडियन्सला ५ जेतेपदं मिळवून दिली होती. त्यामुळे चाहत्यांचे त्याच्यावर प्रेम जास्त होते. हे प्रेम तडकाफडकी कमी होणारे नक्कीच नाही. त्यामुळे एकाच हंगामात त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेणे, हे चाहत्यांना पटलेले नाही. त्यामुळेच हार्दिक पंड्याला चाहते जोरदार ट्रोल करत आहेत. पण हार्दिकही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात घर करू शकतो, त्यासाठी त्याला एक गोष्ट करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सचा गेला सामना पाहा. मुंबई इंडियन्सने तो गमावला. रोहित शर्माने धडाकेबाज शतक झळकावले, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. या सामन्यानंतर हार्दिकने महेंद्रसिंग धोनी आणि पथिराणा या चेन्नईच्या खेळाडूंनी नावं घेतली, पण त्याचवेळी त्याने रोहित शर्माबद्दल एक शब्दही काढला नाही. त्यामुळे हार्दिकला जर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करायचे असेल तर त्याला एकच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे त्याला आपली वागणूक बदलावी लागेल. यापूर्वी रोहित शर्माला त्याने सीमारेषेवर क्षेत्ररक्षणाला पाठवून चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली. पण जेव्हा गरज होती तेव्हा त्याने रोहित शर्मालाच मार्गदर्शन करायला सांगितले होते. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, अशी वागणूक हार्दिक रोहितला देत आहे. सर्वप्रथम हार्दिक रोहितशी जेवढा चांगला आणि नैसर्गीक वागेल, तेवढे त्याच्या पथ्यावर पडेल. उगाच त्याला मिठ्या मारून काहीही होणार नाही, कारण चाहत्यांना या सर्व गोष्टी कळतात. त्याचबरोबर हार्दिकने वागणूकीत बदल करताना अजून एक गोष्ट करायला हवी.

मुंबई इंडियन्सचा संघ हा एक फॅमिली असल्याचे आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. पण हार्दिक कर्णधार झाल्यापासून मात्र तसे दिसत नाही. हार्दिक पंड्या रोहितबरोबर जसप्रीत बुमराहलाही योग्य वागणूक देत नसल्याचे समोर आले आहे. रोहित आणि बुमराह हे दिग्गज खेळाडू आहेत, हे प्रथम हार्दिकने मान्य करायला हवे आणि त्यानंतरच त्याने त्यांच्याशी संवाद साधायला हवा. हार्दिकने जर ही गोष्ट केली तर त्याच्यासाठी हे फार सोपे जाऊ शकते.

हार्दिकने स्वत:च्या स्वभावात बदल करायला हवा, जोपर्यंत हार्दिक ही गोष्ट करणार नाही तोपर्यंत तो मुंबईचा राजा होऊच शकत नाही हे नक्की.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T12:24:17Z dg43tfdfdgfd